Tue, Mar 19, 2019 21:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘खंडणी सम्राट... हाय हाय’; भाजप आमदारांचा मुंडेंवर आरोप

‘खंडणी सम्राट... हाय हाय’; भाजप आमदारांचा मुंडेंवर आरोप

Published On: Mar 01 2018 2:20PM | Last Updated: Mar 01 2018 2:32PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी ‘धनंजय मुंडे... हाय हाय’, ‘खंडणी सम्राट.. हाय हाय’ अशा घोषणा देत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. ऑडिओ टेप म्हणजे पुरावा असून विधिमंडळाच्या सदस्यावर दलालीचे आरोप होत असतील तर या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली. 

वाचा : कोरेगाव-भीमा घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप ? : धनंजय मुंडे 

सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत ‘धनंजय मुंडे.. हाय हाय’चे फलक दाखवत त्यांच्या निलंबनाची मागणी सुरु केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच भाजप सदस्यांनी पुन्हा वेलमध्ये धाव घेतली व घोषणाबाजी सुरू केली. भाजप आमदार अनिल गोटे यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयीची ऑडिओ क्लीप टीव्हीवर प्रसिद्ध झाल्याचे सांगत ही देशाला हादरवणारी घटना आहे. विधान परिषदेत लक्षवेधी विचारण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 

वाचा : राणेंना दिल्लीत संधी? मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची भेट

‘पुराव्यासह आलेल्या या टेपमध्ये विधीमंडळाचा सदस्य दलाली करतो असा आरोप भाजप आमदारांनी केला. या टेपची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच ज्याप्रमाणे परिचारक यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे तत्काळ निलंबन करून चौकशी करण्यात आली त्याप्रमाणे मुंडे यांनाही निलंबित करा, अशी मागणी भाजप आमदारांनी केली.

परिचारकांसारख्या देशद्रोहीना शिक्षा दिली पाहिजे

विधीमंडळात गोंधळ सुरु असताना शिवसेना सदस्यांनी सैनिक पत्नींचा अपमान करणार्‍या प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम करा, अशी मागणी करीत वेलमध्ये धाव घेतल्याने वातावरण अधिकच तापले. 

यावेळी सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत अनिल गोटे यांनी परिचारक यांचे नाव घेतले आहे. परिचारक यांनी देशाच्या सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या पत्नींचा अवमान केला आहे. त्यांमुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. सैनिकांचा अपमान करणार्‍या या देशद्रोहींना शिक्षा दिली पाहिजे. त्यांचे निलंबन का मागे घेतले. त्यांचे निलंबन कायम करा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. यावेळी मुंडे यांच्या निलंबनासाठी भाजपचे आमदार वेलमध्ये उतरले असताना शिवसेना आमदारांनी वेलमध्ये उतरत परिचारिकांचे निलंबन कायम करा अशा घोषणा दिल्या. यावेळी झालेल्या गोंधळामुळे दोनदा कामकाज तहकूब करण्यात आले.

राष्ट्रवादीकडून मुंडेंचा बचाव

अजित पवार यांनी उभे राहत धनंजय मुंडे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दूरचित्रवाहिनीवर जी बातमी चालली आहे त्या क्लीपमध्ये मुंडेंचे नाव नाही, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांचाही आवाज नाही. कुणाचाही आवाज या क्लीपमध्ये नसताना केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, संसदीय कार्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी ही क्लीप ऐकावी किंवा याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली. मात्र त्यानंतरही गोंधळ न थांबल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेत्यांवर होत असलेल्या आरोपांची सत्यता तपासली पाहिजे. माध्यामांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  धनंजय मुंडे आक्रमकपणे शेतकऱ्यांचा मुद्दा, मंत्र्यांचा भ्रष्टाचार मांडतात म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय की काय?, असा सवाल आमदार विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.

वाचा : शेतकरी गुन्हेगार वाटतात का? : धनंजय मुंडे