Sat, Apr 20, 2019 17:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नीरव मोदी प्रकरणाची चौकशी करणारी बीडीओ कंपनीच ‘जीएसटी चोर’

नीरव मोदी प्रकरणाची चौकशी करणारी बीडीओ कंपनीच ‘जीएसटी चोर’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

13 हजार कोटींचा गंडा घालून पळालेल्या नीरव मोदीच्या लेटर ऑफ अंडरस्टँडिंगची (एलओयू) चौकशी करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने नेमलेली बीडीओ इंडिया एलएलपी आणि एमएसकेए अ‍ॅन्ड असोसिएटस् या चार्टर्ड अकाऊंटस् कंपन्यांनी तब्बल 13 कोटी 50 लाख रुपयांचा जीएसटी भरलाच नसल्याचे उघड झाले आहे. जीएसटी संचालनालयाच्या गुप्तचर विभागाने 27 आणि 28 मार्च रोजी टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला. जीएसटी चोरीप्रकरणी एखाद्या सीए कंपनीवर धाड पडण्याची ही पहिली वेळ असल्याचे जीएसटी गुप्तचर पथकाने म्हटले आहे. 

धाड सत्र पूर्ण झाल्यानंतर बीडीओ आणि एमएसकेए  या दोन्ही कंपन्यांकडून  जागेवरच 2 कोटी रुपये वसूल  करण्यात आले. उर्वरित 11.50 कोटी रुपये भरण्यासाठी त्यांना 30 एप्रिल 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

बीडीओ इंडिया ही बीडीओ इंटनॅशनल या जगप्रसिद्ध कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. जागतिक चार्टर्ड अकाऊंटन्सी क्षेत्रात  वॉटर हाऊस कूपर्स, डिलॉईट, अन्स्ट अ‍ॅन्ड यंग आणि केपीएमजी या कंपन्यांनंतर बीडीओ इंटरनॅशनलचा क्रमांक लागतो. त्यामुळे जीएसटी गुप्तचर विभागाच्या या कारवाईला विशेष महत्व आहे. 

बीडीओ इंडिया एलएलपी आणि एमएसकेए अ‍ॅन्ड असोसिएटस् या देशभरात कार्यरत असलेल्या कंपन्या असून 75 कंपन्या त्यांच्या भागीदार आहेत. मुंबई, पुणे, नवी दिल्‍ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई या शहरांमध्ये या कंपन्यांची कार्यालये असून 800 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांची उलाढाल 175 कोटींची आहे. जीएसटीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर बीडीओ इंडियाकडूनच पुरवले जाते. त्याचबरोबर जीएसटीसंदर्भात कुणालाही काही मदत लागली तर ही कंपनी त्यांची कामे स्वीकारते. 

बीडीओ इंडियाला पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून नेमले होते. ही कंपनी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सच्या लेटर अंडरटेकिंगची चौकशी करीत होती. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई आहे.  जीएसटी संचालनालयाच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक विक्रम वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या नेतृत्वामध्ये 40 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. 

घोटाळ्याची पद्धत

जीएसटी कायदा नवा असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीची घडी अद्याप बसलेली नाही. नेमका याचाच गैरफायदा घेत या दोन चार्टर्ड अकाऊंटंट कंपन्यांनी हा घोटाळा केला. मात्र जीएसटीच्या गुप्तचर विभागाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा घोटाळा खणून काढला. 

वसूल केला पण जमा नाही केला

या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांकडून तसेच उद्योजकांकडून जीएसटी वसूल केला मात्र तो सरकारकडे जाणीवपूर्वक जमा केला नाही. या कारवाईनंतर जीएसटीच्या गुप्तचर विभागाने आपली मोहीम अधिक तीव्र करण्याचे ठरवले असून ज्यांना अशा प्रकारच्या करचुकवेगिरीची कल्पना असेल त्यांनी जीएसटी संचालनालयाला त्या कंपन्यांची माहिती कळवावी. त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे संचालनालयाने म्हटले आहे.

चक्‍क दारूवर जीएसटी आकारला

या धाडींमध्ये पुण्यातील दोन अलिशान पबवरदेखील कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दीड कोटींपेक्षा  अधिक  रक्‍कम वसूल करण्यात आली.  या कारवाईवेळी एक गंमतशीर गोष्ट उघडकीस आली. ती म्हणजे, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ब्ल्यू शॅक आणि नाईट रायडर या दोन पबनी त्यांच्या ग्राहकांकडून दारूच्या बिलावर जीएसटी आकारला आणि तो सरकारी तिजोरीत जमा केलेला नाही. वास्तविक दारूला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.  ब्ल्यू शॅक पबने 20 लाख आणि नाईट रायडर पबने 50 लाख रुपयांचा जीएसटी बुडविल्याचे छाप्यात निदर्शनास आले. तर हुक्कावर जीएसटी लावणे अपेक्षित असताना तो आकारला नसल्याचेही दिसून आले.  दुसर्‍या एका पबने 6 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न असताना देखील जीएसटीफ अंतर्गत नोंदणीच केली नसल्याचे दिसून आले. 

 

Tags : nirav modi case, BDO company, investigating, GST, 


  •