Tue, Jun 18, 2019 21:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीडीडी चाळींतील घरे पोलिसांच्या नावावर

बीडीडी चाळींतील घरे पोलिसांच्या नावावर

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 2:02AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील बीडीडी चाळींचा म्हाडामार्फत लवकरच पुनर्विकास करण्यात येणार असून त्यामधील सुमारे 2 हजार 950 सदनिका पोलिसांच्या नावावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबईमध्ये नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी येथे 260 बीडीडी चाळी असून त्यामध्ये 16 हजार 554 रहिवासी रहात आहेत. त्यामधील काही घरे पोलिस वसाहतींसाठी राखीव आहेत. सध्या या चाळी मोडकळीस आल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करण्याची योजना म्हाडाने आखली आहे. याबाबतच्या कामाची लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. पुनर्विकासामध्ये बीडीडी चाळींच्या जागेवर टॉवर उभारण्याची योजना आहे. टॉवर उभे झाल्यानंतर तेथे जादा घरे उपलब्ध होणार आहेत. 

गेल्या 30 वर्षांपासून या चाळींमध्ये राहणार्‍या पोलीस कुटुंबीयांना ही जादा घरे देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात आयोजित केलेल्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबतच्या बैठकीत घेण्यात आला. 
बीडीडी चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. त्यामुळे 1996 नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणार्‍या कुटुंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करता येईल का, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.