Thu, May 23, 2019 14:58
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयुर्वेदिक औषधांचा ‘जाहिरात’ भूलभुलैया

आयुर्वेदिक औषधांचा ‘जाहिरात’ भूलभुलैया

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:15AMठाणे : अनुपमा गुंडे 

तुम्हांला वजन कमी करायचे आहे,  तुमची उंची वाढवायची आहे, मधुमेह बरा करायचा आहे,  एड्स - कर्करोग बरा करायचा आहे... तर त्यावर आमचं औषध गुणकारी आहे,  अशा जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करणारे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशी ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना आजारातून किंवा त्रासातून मुक्त करण्याचा दावा करणार्‍या औषध उत्पादकांवर व वितरकांवर अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. औषध विभागाने गेल्या 3 वर्षांत कोकण विभागातून 64 लाख 28 हजारांची औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी 40 औषध उत्पादक व वितरकांवर सध्या न्यायालयात खटले सुरू आहेत. 

शरीर सुडौल करणार्‍या, उंची वाढविणार्‍या, कामोत्तेजक, मधुमेह, एड्स, कर्करोग बरा करणार्‍या किंवा वेदना दूर करणार्‍या असंख्य औषध उत्पादनांचा ग्राहकांवर विविध माध्यमांतून मारा होतो आहे, हे लक्षात घेऊन अन्न व औषध विभागातील औषध विभागाने  औषधे व जादूटोणा डी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अन्वये कोकण विभागात गेल्या 3 वर्षात 30 ठिकाणी धाडी टाकल्या.

आमच्या औषधाने अमुक आजार बरा होतो, किंवा उंची आणि वजन वाढविण्याचे, कमी करण्याचे अनेक दावे केले जातात, अशा औषधांना औषध विभागाच्या वतीने लक्ष्य करण्यात आले. यात प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधांचा समावेश होता. या औषधांची निर्मिती हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनासाठी परवाना लागतो, मात्र विक्रीसाठी परवानाधारक असण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात या औषधांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. ही बाब औषध प्रशासनाच्या निदर्शनास आली, त्यामुळेच औषध विभागाच्यावतीने गेली 3 वर्षे यासाठी विशेष मोहीम आखून धाडसत्र सुरू केले होते.

या धाडीत शुगर अवे टॅबलेट, जम्बोला लिक्वीड, डायोटुक्स टॅबलेट, शीलाजीत, जपानी पावडर, फास्ट क्युअर, ब्रेस्ट फॉर एनलार्ज, बॉडी टोनर यासारख्या उत्पादनांवर ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचे संदेश देण्यात आले होते. 

जाहिरातींना  बळी पडू नका

काही आयुर्वेदिक औषधांवर चमत्कारासारखे दावे करून रूग्णांची फसवणूक केली जाते. रूग्णांनी अशी औषधे घेतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, चमत्कारिक दावे करणार्‍या अशा जाहिराती औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, आमच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन औषध विभागाचे कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनीकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केले. 

38 लाखांची औषधे गरजूंना वाटण्याचे आदेश

यापुर्वी झालेल्या अशा कारवायांमध्ये  औषधे व वितरकांवर केवळ दंडाची शिक्षा होत असे. नवी मुंबई न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना या जप्त करण्यात आलेल्या औषधांमधील 38 लाखांची औषधे  शासकीय आयुर्वेदिक रूग्णालयांना देण्याचे तसेच तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजू रूग्णांना देण्याचे आदेश नवी मुंबई न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे औषध विभागांच्या कारवाईना बळ मिळाले आहे, अशी भावना औषध विभागाच्या आधिकार्‍यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.