मुंबई : पुढारी ऑनलाईन
अयोध्येतील राममंदिरच्या संदर्भात नाक खुपसू नका, असा इशारा शिवसेनेने अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर यांना दिला आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरी दोन्ही पक्षांनी संगनमताने हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत श्री श्री रवी शंकर यांनी व्यक्त केले होते. अयोध्येचा प्रश्न सुटणार नाही सांगण्यासाठी गुरू महाराजांची गरज नाही, असा उल्लेख शिवसेनेने आपल्या मुखपत्रात केला आहे.
मुस्लिमांनी सद्भावना दाखवावी या बाजारगप्पा आम्ही अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. रविशंकर यांच्या अयोध्येप्रश्नी वक्तव्यात सत्व कमी आणि राजकारण अधिक दिसते, असे शिवसेनेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांनी या प्रश्नी तोडगा काढावा असे सांगत आश्वासन पाळावे, अशी कोपरखळी देखील शिवसेनेने मारली आहे.
अयोध्येच्या रणात नसणाऱ्यांनी ‘रामनामा’चा जप सुरू करत लुडबुड सुरू केली आहे. बाबरी तुटलीच नसती तर राममंदिराची शिला रचता आली नसती, असा उल्लेख करत शिवसेनेने राममंदिराचा मार्ग खुला झाल्याचा उल्लेख शिवसेनेने अग्रलेखात केला आहे. बाबरी तोडली त्यांना गुन्हेगार ठरवून राममंदिराचे राजकीय स्वार्थाचे डबडे वाजवणे बंद करा, अशा शब्दात शिवसेनेने केंद्र सरकारवरही तोफ डागली आहे.