Wed, Apr 24, 2019 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रॉपर्टीसाठी आशाबाईंना केले आयेशा बी

प्रॉपर्टीसाठी आशाबाईंना केले आयेशा बी

Published On: Apr 25 2018 2:03AM | Last Updated: Apr 25 2018 1:57AMमुंबई : प्रतिनिधी

मृत   वृद्ध  महिलेच्या  मालकीचे  घर, बँकेतील पैसे, दुकान  आणि दागिने हडपण्यासाठी आरोपी जमील खाने आपल्या साथीदारांच्या मदतीने  67 वर्षीय हिंदू वृद्धा आशाबाई काशीराम  मुळे ह्या मुस्लीम असल्याचे भासवून त्यांचा दफनविधी केला. पालिकेच्या स्मशानभूमी नोंदवहीत खाडाखोड केल्याने आणि मृतदेह दफन केल्याने मृत आशाबाई की आयेशा बी असा प्रश्‍न निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांना मृतवृद्धेचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सर्व्हिस बूक मिळाल्याने ती वृद्धा आयेशा बी नाही तर आशाबाई मुळेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विक्रोळी पूर्व येथील टागोर नगरजवळील जैन मंदिराजवळ  वृद्ध  आशाबाई मुळे   राहत  होत्या. 19 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. पण, त्यांचा  कोणी  नातेवाईक  किंवा वारसदार नसल्याने आरोपीने त्यांच्या नावावरील घर, दुकान, दागिने आणि बँकेत पैसे लाटण्यासाठी त्यांना मुस्लीम भासवून तिचा दफनविधी केला. आरोपींनी स्मशानभूमीच्या नोंदवहीत खाडाखोड केल्यामुळे मृतक हिंदू की  मुस्लीम असा प्रश्‍न निर्माण झाला होता. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते देविदास कुचेकर (जाधव), सुभाष गुप्ता, आणि महेंद्र मगरे यांनी परिमंडळ-7 चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांची भेट घेतल्यानंतर या प्रकाराच्या चौकशीने वेग घेतला.

 विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. मोरे यांनी मंगळवारी मृत महिला ही हिंदू आशाबाई मुळे असल्याचे पुरावे सापडल्याचे कुचेकर यांना सांगितले. पण, स्मशानभूमीतील नावात कोणी खाडाखोड केली, वैद्यकीय प्रमाणपत्र कोणी दिले, या प्रकरणात  कोणाकोणाचा सहभाग आहे,  याचा तपास सुरू आहे. या प्रकारामुळे विक्रोळीत तीव्र संताप व्यक्त होत असताना प्रकरणाच्या चौकशीत अनेकजण गजाआड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

Tags : Mumbai, Ayesha B, aspiration, for property, Mumbai news,