होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बनावट दस्तावेज बनवून अ‍ॅक्सिस बँकेची ३.३६ कोटींची फसवणूक

बनावट दस्तावेज बनवून अ‍ॅक्सिस बँकेची ३.३६ कोटींची फसवणूक

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:42AMठाणे : प्रतिनिधी 

बनावट दस्तावेजांच्या आधारे अ‍ॅक्सिस बँकेतून व्यक्तिगत कर्ज काढून बँकेची फसवणूक करणार्‍या टोळीचा नौपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी बँक कर्मचारी, एजंट यांच्यासह 7 आरोपींना अटक केली. अटकेतल्या आरोपींकडून फसवणूक केलेल्या 3 कोटी 36 लाखांच्या रक्कमेपैकी 1 कोटी 10 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात आणखीन तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

बनावट दस्तावेजाच्या आधारे अपात्र लोकांना अ‍ॅक्सिस बँकेतून व्यक्तिगत कर्ज मिळवून देणारी टोळी मागील 4 महिन्यांपासून ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. या टोळीतील कर्ज मिळवून देणारे काही एजंट बँकेच्या कर्मचार्‍यांशी हातमिळवणी करून फसवणूक करीत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी बँकेचे अधिकारी सुहास हांडे (31) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात बँकेची 3 कोटी 36 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार नोंदवली होती. 

गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत कर्ज मिळवून देणार्‍या टोळीचा छडा लावला. बँकेने अपात्र ठरवलेल्या लोकांना बनावट दस्तावेजाच्या आधारे कमिशनची मोठी रक्कम स्वीकारून व्यक्तिगत कर्ज मिळवून देणार्‍या या टोळीत काही बँकेचे कर्मचारीही सहभागी असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅक्सीस बँकेचे सेल्स मॅनेजर रोहित  भावसार, सेल्स प्रतिनिधी चेतन शेरे, स्टाफ अधिकारी नितीन घाडीगावकर, बँक डाटा एन्ट्री ऑपरेटर गिरीश भोईर आदी बँकेच्या कर्मचार्‍यांसह प्रशांत कीर, सईद  शेख, रवींद्र ठाकूर या कर्ज मिळवून देणार्‍या दलालांना अटक केली आहे. या टोळीतील आणखी तिघेजण फरार आहेत. 

या टोळीने कर्ज मिळवून दिलेल्या ग्राहकांचे जबाब नोंदवण्यात आले असून फसवणूक झालेल्या 3 कोटी 36 लाखांच्या रक्कमेपैकी 1 कोटी 10 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी काही संगणक आणि हार्डडिस्कही जप्त केल्या असून त्या तपासल्या असता बँकेची फसवणूक केल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

Tags : mumbai, mumbai news, Axis Bank, fraud, making fake document,