होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विडी ओढण्यास मज्जाव; कैद्याचा पोलिसावर हल्ला

विडी ओढण्यास मज्जाव; कैद्याचा पोलिसावर हल्ला

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:57AMठाणे : प्रतिनिधी 

विडी ओढण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सहा कैद्यांना मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी नेत असताना कारागृहाच्या आवारात शनिवारी हा प्रकार घडला. 

शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बालकाचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी तावडे याच्यासह अन्य पाच कैद्यांना दिंडोशी न्यायालयात सुनावणीला नेण्यासाठी कारागृहातून बाहेर काढले होते. तेव्हा कैदी तावडे याने बंदोबस्तावरील पोलीस शिपाई काकडे यांना घरी फोन लावून देण्याची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. 

जोरदार पाऊस सुरु झाल्याने सर्व कैद्यांना कारागृहाच्या आवारातील शेडमध्ये थांबवले होते. त्याठिकाणी तावडे आणि कैदी पवनकुमार साधू यांनी विडी ओढण्यास सुरुवात केल्याने महिला पोलिसांनी आक्षेप घेतला. तेव्हा काकडे यांनीही त्यांना विडी ओढण्यास मज्जाव केल्याने संतापलेल्या तावडे याने शिपाई चौधरी याच्या कंबरेचा बेल्ट तोडून पोलिसांना धक्क्बुक्की केली.