Sun, May 26, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने भागवली मोकाशीपाड्याची तहान

ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने भागवली मोकाशीपाड्याची तहान

Published On: Jan 08 2018 10:22AM | Last Updated: Jan 08 2018 10:22AM

बुकमार्क करा
जव्हार : वार्ताहर

जव्हार तालुक्यातील सारसून, मोकाशीपाड्याला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने तब्बल साडेआठ लाख रुपयांचा निधी दिला. त्यांच्या भरीव योगदानामुळे गावात नळ पाणीपुरवठा योजना आकारास आली. तिचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते रविवारी करण्यात आले.

मोकाशीपाड्यात ६४ कुटुंबांचे वास्तव्य आहे. या गावाची पाणीपुरवठा योजना अस्तित्वात नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. येथे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात व्हायची, तर एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई उग्र रूप धारण करायची. ग्रामस्थांची गैरसोय ओळखून सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणार्‍या मुरलीधर कुमार, वंदना कुमार यांनी 8 लाख 50 हजार रुपयांचा निधी दिला. या निधीतून मोकाशीपाड्यात नळपाणी योजना तयार करण्यात आली. पाड्यात 9 स्टँड पोस्ट बसवण्यात आले असून 11 हजार लिटरची टाकी बांधण्यात आली आहे. या पाणीपुरवठा योजनेचे रविवारी कुमार दाम्पत्याच्या हस्ते समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आदिवासी आघाडी अध्यक्ष हरिश्‍चंद्र भोये, श्रीधर कोचरेकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले, समाजसेवक प्रकाश चौधरी, पाणीपुरवठा योजनेचे अभियंता प्रवीण मिसळ, सरपंच सुशीला घाटाळ, शरद शेळके, पोलीस पाटील मधू जंगली, उपसरपंच रवींद्र ओळंबा, योगेश भोये तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारी योजना मिळेल तेव्हा मिळेल, मात्र आम्हला कुमार दाम्पत्याच्या मदतीमुळे मुबलक पाणी मिळाले, अशी भावना व्यक्त करून महिलांनी आनंद व्यक्त केला. हा आनंद साजरा करण्यासाठी तारपानाच करण्यात आला.