Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबादचे पोलीस आयुक्‍त सक्‍तीच्या रजेवर

औरंगाबादचे पोलीस आयुक्‍त सक्‍तीच्या रजेवर

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMमुंबई : खास प्रतिनिधी

औरंगाबादमधील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या  नागरिकांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद आज विधानसभेत उमटले. सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षाच्याही आमदारांनी आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरीत सभागृहाचे काम पाचवेळा बंद पाडले. औरंगाबादच्या पोलीस आयुक्‍तांना निलंबित करण्याची मागणी करीत आमदारांनी सभागृह दणाणून सोडले. अखेर औरंगाबादचे पोलीस आयुक्‍त यशस्वी यादव यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवून मारहाणीची अतिरिक्‍त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यादव यांना आजपासूनच एक महिन्याच्या सक्‍तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

औरंगाबाद शहरात तब्बल अडीच हजार टन कचरा साठल्याने झालेली कचराकोंडी आणि त्यामुळे शहरातील कचरा डेपो-कुंड्या भरून वाहू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले असून पोलिसांनी नागरिकांना अमानुष मारहाण केली आहे. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली होती. विखे-पाटील म्हणाले की, औरंगाबाद पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण केली. ही दडपशाही करताना पोलिसांनी लहान मुले अन् महिलांना सोडले नाही. 

पोलीस आयुक्‍तांसह महापालिकेच्या आयुक्‍तांवरही कारवाई करण्याची जोरदार मागणी विखे यांनी केली. राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील  म्हणाले की, नारेगाव कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून पंचक्रोशीतील नागरिकांनी मनपाला चार महिन्यांची मुदत दिल्यानंतरही प्रशासनाकडून कचर्‍याचे नियोजन करण्याकडे दुर्लक्ष झाले. त्याची सरकारस्तरावर चौकशी करण्यात येईल. तसेच मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या नागरिकांना अमानुषपणे मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस आयुक्‍तांची वरिष्ठस्तरावरून चौकशी केली जाईल.