होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबादमधील खून, दरोड्याचा तपास एसपींकडे

औरंगाबादमधील खून, दरोड्याचा तपास एसपींकडे

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 12:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

औरगाबादमधील व्यापार्‍यांच्या घरांवरील दरोडे व हत्याप्रकरणांचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी दुसर्‍या जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांकडे (एसपी) सोपविण्यात येईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.    

ईश्‍वरचंद माणकचंद मुथा यांची गाडी अडवुन दरोडेखोरांनी लुटमार केली. तर  राजुलबाई माणिकचंद पाटणी व केशवचंद उत्तमचंद जाजु यांच्या घरांवर दरोडे टाकून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. विनोदकुमार जाजु व चंपालाल लोढा यांच्या घरी चोर्‍या करुन त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कोणालाही अटक केली नसल्याबाबत काँग्रेसचे सदस्य सुभाष झांबड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. 

 त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले, अधिवेशन संपल्यावर आपण औरंगाबदला जाऊन पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊ. तसेच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमु. 

या उत्तरावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी तोपर्यंत आपण दरोडेखोरांना दुसरे गुन्हे करण्यासाठी वेळ देत आहात का, असा खोचक सवाल केला. सरकारचा पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, असा आरोप करत त्यांनी गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली असता या गुन्ह्याचा तपास सीआयडींकडे सोपविण्यात येईल, असे उत्तर केसरकर यांनी दिले.