Thu, Sep 20, 2018 01:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › औरंगाबादचे पालकमंत्री पद रामदास कदमांकडून काढले

औरंगाबादचे पालकमंत्री पद रामदास कदमांकडून काढले

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी सुरू असलेला वाद पर्यावरणमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना भोवला आहे. त्यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेवरून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पालकमंत्रीपदांमध्ये हा खांदेपालट केला आहे. 

औरंगाबाद शिवसेनेच्यादृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे. मराठवाड्यातील हे सत्ताकेंद्र मजबूत करण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांची तेथे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, रामदास कदम यांच्या नियुक्तीनंतर स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला. औरंगाबाद महापालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद निवडणूक दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. अखेर या वादाची दखल उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली. रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून हटविण्याची सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यानुसार बुधवारी पालकमंत्री फेरबदलाचे आदेश जारी झाले. 

रामदास कदम यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते भंडरा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तर कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

याशिवाय राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे परभणी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खैरे आणि रामदास कदम यांच्या वादत उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्या बाजूने कौल दिला आहे. कदम यांच्याऐवजी शांत स्वभावाच्या डॉ. सावंत यांच्याकडे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिली.