Thu, Jun 27, 2019 13:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव

सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:11AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील सिद्घिविनायक मंदिरातील ख्रिसमसच्या मुहुर्तावर झालेल्या दागिन्यांच्या लिलावातून सोमवारी 15.75 लाख रुपये जमा झाले.

2009 पासून आयोजित करण्यात येणार्‍या या लिलावामध्ये आजचा 24वा लिलाव होता. या लिलावालाही भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या लिलावातून तब्बल 108 सोन्याचे अलंकार भाविकांनी खरेदी केले. यामध्ये 1 ग्रॅमच्या नाण्यापासून ते 70 ग्रॅम वजनांच्या बांगड्यांचा समावेश आहे. हार, लॉकेट, चेन, नाणी अशा ऐवजाच्या लिलावातून न्यासाला 15 लाख 75 हजार इतके रुपये मिळाले आहेत. वर्षभरात श्री चरणी भक्‍तांनी अर्पण केलेल्या तसेच न्यायासकडे असलेल्या सोन्याच्या अलंकारांच्या लिलावाचे आयोजन केले होते. यामध्ये श्रीगणेश प्रतिमा, लॉकेट्स, दुर्वा, मोदक, अंगठया, सोन्याच्या साखळया, हार यांचा समावेश होता. हे दागिणे प्रदर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आले. एक रक्‍कमी बोलीतून लिलावाला सुरुवात झाल्यानंतर भाविकांना लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. सोमवारी दिवसभर चाललेल्या या लिलावात भाविकांनी चांगला सहभाग घेतला.

या लिलावाच्या विक्रीतून मिळणार्‍या निधीचा विनियोग हा न्यासाकडून राबविण्यात येणार्‍या रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य, माफक दारात डायलेसिस उपचार, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, पुस्तकपेढी योजना, नैसर्गिक आपत्ती व जलसंधारण क्षेत्रातील शासनाच्या विविध योजना लोकोपयोगी उपक्रमांसाठी राबविण्यात येतो अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी यावेळी दिली. लिलावाच्या दरम्यान न्यास समिती सदस्य सुमंत घैसास, संजय सावंत, महेश मुदलीयार तसेच कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यावेळी उपस्थित होते.