होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यशोवर्धन बिर्लाच्या मालमत्ता जप्तीकडे लक्ष 

यशोवर्धन बिर्लाच्या मालमत्ता जप्तीकडे लक्ष 

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 2:00AMमुंबई : अवधूत खराडे 

आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा करून त्याचा परतावा न देता बिर्ला ग्रुप ऑफ कंपन्यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या यशोवर्धन बिर्लाच्या जुहूतील कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेच्या जप्तीवर अखेर चार वर्षांनी न्यायालय निर्णय देणार आहे. ही मालमत्ता लिलावात काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर तपासयंत्रणेचे हे मोठे यश ठरणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बिर्ला पॉवर सोल्युशन लि. कंपनीसह कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक यशोवर्धन बिर्ला, व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. आर. मूर्ती, तसेच अन्य संचालकांविरोधात 30 डिसेंबर 2013 रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून 29 मार्च 2014 रोजी याप्रकरणात मुख्य आरोपपत्र, तर 20 ऑक्टोबर 2016 रोजी या गुन्ह्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने बिर्ला ग्रुपच्या काही मालमत्ता जप्त केल्या असून यातील 24 कोटी रुपयांच्या मालमत्ता लिलाव करून विकल्या आहेत. जुहूतील कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेच्या जप्तीवर अखेर चार वर्षांनी सत्र न्यायालयाच्या विशेष एमपीआयडी कोर्टात बुधवारी निर्णय होणार आहे. ही मालमत्ता जप्त करू नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न करून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. मात्र याला विरोध करण्यात आला असल्याचे विशेष सरकारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

यशोवर्धन बिर्लाच्या लक्ष्मी प्रॉपर्टीजच्या नावावर जुहूमधील मोक्याच्या ठिकाणी करोडो रुपये किमतीची मालमत्ता आहे. ही मालमत्ता तारण ठेऊन बिर्लाने त्याच्यावर सीरियस फायनान्स कंपनीकडून अवघे 21 कोटींचे कर्ज घेतले. त्यामुळे या फायनान्स कंपनीनेसुद्धा जमीन जप्त करू नये म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. तर यशोवर्धन बिर्लाने 7 ऑगस्ट 2014 रोजी कंपनीचा राजीनामा देऊन निर्वाण, वेदान्त या दोन मुलांना कंपनीचे संचालक बनविले आणि आपला कंपनीशी काही संबंध नसल्याची कागदपत्रे तयार केली. त्यानंतर कंपनीचे नावसुद्धा बदलून श्रीनिका इन्फ्रा ठेवण्यात आले.

नवीन नाव धारण केलेल्या कंपनीनेसुद्धा गुन्ह्याशी या कंपनीचा संबंध नसल्याचा दावा करून मालमत्ता जप्त न करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावरसुद्धा बुधवारी सुनावणी होणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या बिर्लाच्या दोन कंपन्यांच्या 24 कोटींच्या मालमत्ता विकण्यात आल्या असून यातून मिळालेल्या रकमेच्या वाटपावरही न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, बिर्ला ग्रुपने हे बनाव करण्यासोबतच त्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर मागच्या तारखेचे व्यवहार दाखवत (बॅक डेटेड) 16 ऑक्टोबर 2013 रोजी हे शेअर्स श्रीकृष्ण अर्पण ट्रस्टला दान दिले. कंपनीचे तब्बल 92.96 टक्के शेअर्स यशोवर्धन बिर्ला याच्याकडे होते. हे शेअर्स दान केल्याची धक्कादायक माहिती रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वेबसाईटवरून समोर आली आहे. 

काय होता घोटाळा?

यशोवर्धन बिर्ला ग्रुपच्या कंपन्यांनी आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवत मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट), आयसीडी ठेवी, बिल ऑफ एक्स्चेंज अशा तीन प्रकारांमध्ये कंपन्या आणि व्यक्तींकडून सुमारे 400 कोटीहून अधिक ठेवी स्वीकारल्या. मात्र दिलेल्या मुदतीत त्याचा परतावा न देता करण्यात आलेल्या घोटाळ्यात बिर्ला पॉवर सोल्युशन, झेनिथ बिर्ला (इंडिया) लि., बिर्ला कॉटसीन (इंडिया) लि., बिर्ला श्‍लोक एज्युटेक लि. या चार कंपन्यांमध्ये सुमारे 108.07 कोटी रुपयांच्या 19 हजार 65 मुदत ठेवी, तर 297 कोटींच्या आयसीडी ठेवी गुंतवणूकदारांनी ठेवल्या होत्या. यातील 277 कोटींच्या ठेवीची मुदत पूर्ण होऊनही त्यांना परतावा न देता रकमेचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले. स्वीकारलेल्या ठेवींपैकी 188.52 कोटी रक्कम बिर्ला ग्रुपच्या आठ कंपन्यांत वळती करण्यात आली. बिर्ला सूर्या लि. कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यात आलेल्या 82.16 कोटी रकमेतून खंडाळ्यामध्ये 123 एकर जमीन खरेदी करण्यात आली. विजय पुरंजय मिनरल्स प्रा. लि. कंपनीचे सहभाग खरेदीसाठी 5 कोटी दिल्यानंतर या रकमेतून कंपनीने आंध्र प्रदेश येथे 300 एकर जमीन खरेदी केली. 100 कोटींची रक्कम ललित गुप्ता यांच्या मालकीच्या चार कंपन्यांच्या खात्यात वर्ग केली. नंतर ही रक्कम पुन्हा बिर्ला ग्रुपच्या दोन कंपन्यात वळविण्यात आल्याचे समोर आले आहे.  गुन्हा दाखल होताच रकमा पळवापळवीस सुरुवात झाली आणि काही गुंतवणूकदारांना अवघ्या 30 ते 40 टक्क्यांमध्ये सेटल केले गेल्याची माहिती मिळते.