Fri, Sep 20, 2019 04:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फलाटावर झोपण्याच्या वादातून कोयत्याने वार

फलाटावर झोपण्याच्या वादातून कोयत्याने वार

Published On: Dec 06 2017 3:58PM | Last Updated: Dec 06 2017 3:58PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये बंडू सोनावणे हा गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे.

सलमान असे या घटनेतील फरार हल्लेखोराचे नाव आहे. चाळीसगाव येथील मूळ रहिवाशी असलेला जखमी बंडू सोनावणे आणि फरार हल्लेखोर सलमान हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर एकत्र राहत होते. दरम्यान, शनिवारी दोघांनी एकत्र रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण आणि मद्यप्राशन केले.

दरम्यान, त्याचे बिल फरार सलमान यानेच दिले होते. शनिवारी रात्री झोपण्याच्या जागेवरून त्यांच्यात वाद झाला. बंडूने सलमानला झोपण्यास विरोध केल्याने त्याने दारूच्या नशेत त्याच्यावर रागाच्या भरात कोयत्याने हल्ला केला. हा प्रकार सीएसटीकडील एक नंबर फलाटाच्या 100 मीटर पुढे कोपरी येथे घडला. यावेळी हल्लेखोराने डोक्यावर आणि हातावर वार करून पळ काढला.

दरम्यान हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत बंडू सोनावणे हा फलाट क्रमांक दोन येथील ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आला. रक्ताने माखलेला पाहून त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, डोक्यावर झालेल्या हल्ल्याचे घाव लक्षात घेऊन तातडीने त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले.

याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपासात त्यांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे हल्लेखोर सलमानची ओळख पुढे आली आहे. फरार हल्लेखोराचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex