ठाणे : प्रतिनिधी
ठाणे मध्यवर्ती कारागृहात दोघा कैद्यांनी तोडफोड करून तुरुंग अधिकार्यांवरच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. आशिष नायर आणि अभिनव तेजबहादूर सिंग अशी हल्लेखोर कैद्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी दिंडोशी न्यायालयात सुनावणीसाठी गेले असता यातील नायर या कैद्याने सहकारी कैद्याला काही नशेच्या कॅप्सूल गिळायला लावल्या होत्या. तेथून ठाणे कारागृहात परतल्यावर त्या कॅप्सूल उलटी करून पोटातून काढण्यासाठी नायर सतत दबाव टाकून सहकारी कैद्याचा शारीरिक छळ करीत असे. त्याबाबतच्या तक्रारी आल्याने चौकशीसाठी तुरुंग अधिकार्यांनी बोलावल्याचा राग आल्याने त्याने हा हल्ला केला. याप्रकरणी नायरसह त्याचा साथीदार सिंग या कैद्यांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक 3 मध्ये न्यायबंदी आशिष नायर व छोटेलाल दुलारे सहानी आदी कैदी शिक्षा भोगत आहेत.18 ऑगस्ट रोजी दिंडोशी न्यायालयात सुनावणीसाठी गेले असता नायरने सहानी याला काही कॅप्सूल गिळायला लावल्या होत्या. ठाणे कारागृहात परतल्यावर पोटातील त्या कॅप्सूल उलटीद्वारे काढून देण्यासाठी नायर हा दबाव टाकत होता.यासाठी तो सहानी या कैद्याला मिठाचे पाणी आणि तंबाखूचे पाणी पाजून उलटी करण्यास सांगत असे. मात्र, उलटी करूनही ‘त्या’ कॅप्सूल बाहेर पडल्या नाहीत. मात्र, वारंवार जबरदस्तीने तंबाखू व मिठाचे पाणी प्राशन करावयास लावल्याने सहानी याची प्रकृती ढासळू लागली.
याबाबतची तक्रार सहानी याने कारागृहातील वॉर्डन इरफान पठाण यांच्यासह कारागृहाच्या तुरुंग अधिकार्याकडे केली होती. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी तुरुंग अधिकारी सतीश दिनकर माने, कानसकर व तुरुंग अधिकारी शिंदे यांनी नायर याला शनिवारी सकाळी चौकशीसाठी कार्यालयात बोलावून चौकशी सुरु केली. तेव्हा, संतप्त झालेल्या नायर याने, तुम क्या करोगे मेरा असे बोलून तिघांही अधिकार्याना शिवीगाळ करीत टेबलावरची लाकडी पट्टी मारण्यासाठी अंगावर धावून जात तुरुंग अधिकार्यांना धक्काबुक्की केली. त्याचदरम्यान बॅरक क्रमांक एकमध्ये शिक्षा भोगत असलेला बंदिवान अभिनव तेजबहाद्दूर सिंग हा बँरकच्या बाहेर उभा होता. तोही नायर याच्या मदतीसाठी धावत येऊन त्याने तुरुंग अधिकार्यांना धक्काबुक्की केली.