Mon, May 27, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोर्ट आवारातआरोपींना चोप

कोर्ट आवारातआरोपींना चोप

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:21AMकल्याण : वार्ताहर

डोंबिवली येथील अथर्व वारंग या चिमुकल्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करत त्याची हत्या केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी एहसान आलम आणि नदीम आलम या दोन नराधमांना अटक केली होती. त्यांना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले. मात्र, आपल्या  पोटाच्या गोळ्यासोबत केलेल्या सैतानी कृत्याचा राग मनात खदखदणार्‍या अथर्वच्या आईने या दोन नराधमांना न्यायालयाच्या आवारात चांगलाच चोप दिला. पोलिसांनी कसेबसे दोघा नराधमांना कुटुंबीयांच्या तावडीतून सोडवत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

डोंबिवली देसलेपाडा येथे राहणारा अथर्व 24 मे रोजी घराबाहेर खेळताना बेपत्ता झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता 25 मे रोजी दुपारी अथर्वचा मृतदेह त्याच्या घराजवळ नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत सापडला.  

शवविच्छेदन अहवालात अथर्वला गुंगीचे औषध देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी प्लम्बिंगचे काम करणार्‍या एहसान आलम आणि त्याचा साथीदार नदीम आलम या दोघांना ताब्यात घेत सत्य समोर आणले.

बिहार येथील किसनगंज येथे राहणार्‍या एहसानने ओळखीचा फायदा घेत अथर्वला गुंगीचे औषध पाजले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर अथर्वला मृत झाल्याचे समजून त्याने नदीमच्या मदतीने त्याला ड्रेनेजच्या टाकीत टाकले.