Tue, Apr 23, 2019 19:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अथर्वच्या रॉयल पाल्म्समधील मृत्यूचे गूढ कायम

अथर्वच्या रॉयल पाल्म्समधील मृत्यूचे गूढ कायम

Published On: May 14 2018 1:54AM | Last Updated: May 14 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

गोरेगावच्या रॉयल पाल्मस कॉम्प्लेक्समध्ये मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या अथर्व शिंदे(20) या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र, त्या पार्टीला उपस्थित असलेल्या 12 तरुणांच्या चौकशीत अथर्ववर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. परंतु, त्यावेळी ही मुले दारू व ड्रग्जच्या अंमलाखाली असल्याने त्याबाबत सुसंगत व स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.  

अथर्व हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा असून तो सोमवारी संध्याकाळी पार्टीला गेला होता. तर बुधवारी लेक परिसरात त्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर गंभीर जखमाही आढळून आल्या असल्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते. अथर्व याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी त्या पार्टीस हजर असलेल्या 12 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. हे सर्व तरुण विशीच्या आतील आहेत. तसेच त्यांना फेर चौकशीसाठी बोलवून अधिक माहिती घेण्याचा व माहितीची सुसंगत वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला आहे.  मुलांच्या चौकशीतून पार्टीमध्ये खुलेआम दारू व ड्रग्ज घेतले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणार्‍या इसमांमध्ये दोन-तीन वेळा झगडाही झाल्याची माहिती संबंधीत मुलांनी दिली आहे. अथर्ववर हल्ला झाल्याचेही त्यांच्या जबाबातून पुढे आले आहे. मात्र, त्यावेळी मुले ड्रग्जच्या अंमलाखाली असल्याने त्यांच्या जबाबात विसंगती आढळली असून त्यामुळे चित्र स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हा तपास आरे पोलीस करीत आहेत. पोलिसांनी सदर बंगला व परिसरातील आठ सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यातूनही पोलिसांच्या हाती अजून तरी महत्त्वाचे धागेदोरे आलेले नाहीत. यापैकी चार सीसीटीव्ही फुटेजमध्ये अथर्व हा मुख्य रस्त्यावर रिक्षा शोधत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर,  काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या व पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार अथर्व  बुधवारी सकाळी 7 वाजता त्या बंगल्यातून बाहेर पडला.  या बंगल्याची सर्वच गेट बंद असल्याने अथर्व रस्त्याकडील बाजूच्या गेटवर चढून त्याने बाहेर उडी मारली व तो त्या परिसरात असलेल्या लेककडे गेला. त्यावेळी तो शक्तीहीन, गळून गेलेल्या माणसासारखा चालत होता, तो जखमी होता अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्याच्या पोस्टमार्टेमध्ये त्याच्या छातीवर आघात केल्याचे आढळून आले आहे. त्याचा मृत्यू होण्यामध्ये हेही कारण महत्त्वाचे ठरले आहे.  दरम्यान, चौकशीदरम्यान आरे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आपल्याला मारझोड केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केला आहे.