Mon, Nov 19, 2018 23:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुकल्या अथर्वचा मृत्यू संशयास्पद 

चिमुकल्या अथर्वचा मृत्यू संशयास्पद 

Published On: May 27 2018 1:23AM | Last Updated: May 27 2018 1:16AMडोंबिवली : वार्ताहर

मानपाड्यातील लहानग्या अथर्व वारंग याच्या मृतदेहाचे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले; परंतु या अहवालात स्पष्टता नसल्याने तपास कोणत्या दिशेने करावा असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेत तेरा ते चौदा कामगारांची चौकशी केल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याकडून मिळते. 

घराजवळ खेळताना गुरुवारी सकाळी अचानक बेपत्ता झालेल्या वारंग कुटुंबातील सात वर्षीय अथर्वचा मृतदेह अग्‍निशमन दलाच्या जवानांना शुक्रवारी सकाळी जवळच सुरू असलेल्या बांधकामा शेजारील ड्रेनेजच्या टाकीत तरंगत्या अवस्थेत सापडला. यामुळे बांधकाम विकासकच या घटनेला कारणीभूत आहे, असा ठाम आरोप वारंग कुटुंबीयांनी केला आहे. विकासकावर कारवाई करा, अशी मागणी होत असून जर गुन्हा दाखल झाला नाही तर मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही दिला जात आहे. 

या घटनेत डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत अथर्वचा मृत्यू संशयास्पद असल्याचे समोर आल्याने ग्रामीण विभागात खळबळ उडाली.  मुलाच्या अंगावर जखमा होत्या, त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. मात्र, जे.जे. रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालातही स्पष्टता नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. यामुळे पोलिसांना तपास करणे कठीण जात आहे.