Wed, Jan 23, 2019 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अटलजींच्या तीन भेटींचे लाभले डोंबिवलीकरांना भाग्य

अटलजींच्या तीन भेटींचे लाभले डोंबिवलीकरांना भाग्य

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:23AMडोंबिवली : वार्ताहर

स्वामी विवेकानंदांचे निस्सीम शिष्य म्हणून ओळख असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची डोंबिवलीकरांशी तीनदा भेट झाली होती. वाजपेयी हे स्वामी विवेकांनंद यांचे शिष्य होते आणि म्हणूनच तत्कालीन प्रदेश नेत्याचा विरोध असताना ते डोंबिवलीत 31 डिसेंबर 1980 रोजी आले होते. त्यांच्या हस्ते त्यावेळच्या डोंबिवली नगरपालिकेच्या इमारतीवरील स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याची आठवण डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी सांगितली.

डोंबिवली नगरपालिकेने पालिकेच्या इमारतीला दर्शनीस्थळी स्वामी विवेकानंद यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण लोकसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे हस्ते करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. त्याला शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांनी अनुमोदन दिले होते. या संदर्भात माजी नगराध्यक्ष पटवारी म्हणाले, नगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन मी पक्षाच्या प्रदेश नेत्यांकडे गेलो व अटलबिहारी वाजपेयी यांना डोंबिवलीत आणण्यासाठी विनंती केली. 

मात्र, त्यावेळच्या एका प्रदेश नेत्याने याला विरोध केला. वाजपेयींना तुम्ही लहान समजता का? असा सवाल त्या प्रदेश नेत्यानेकेला. इतक्यात तेथे वेदप्रकाश गोयल (विद्यमान रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे वडील) तेथे आले व त्यांनी आपण वाजपेयींना भेटू असे सांगितले. त्यानंतर आम्ही दिल्लीत गेलो आणि वाजपेयींना आमंत्रण दिले. तुम्हाला बोलविण्याचा आणि स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण तुमच्या हस्ते करण्याचा डोंबिवली नगरपालिकेने एकमताने प्रस्ताव केला असल्याचे सांगितले. तेव्हा वाजपेयाी यांनी एकूण किती खर्च केला, पुतळा कसा आहे, बजेट किती, असे प्रश्न विचारून अवास्तव खर्च केला नाही ना? असाही प्रश्न केला. समाधानकारक उत्तरे आणि अपेक्षित माहिती मिळाल्यानंतरच त्यांनी डोंबिवलीत येण्याचे मान्य केले.

यावेळी त्यांनी मी राजकारणावर काही बोलणार नाही; मी येणार तो केवळ स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून येणार असून फक्त त्यांच्या बद्दलच बोलणार अशी अट त्यांनी घातली. त्याप्रमाणे ते आले व त्यांनी तब्बल पाऊण तास स्वामी विवेकांनद यांच्याबद्दल उद्बोधक भाषण केल्याची आठवण पटवारी यांनी सांगितली. हा कार्यक्रम सध्या ज्या भागाला इंदिरा चौक म्हणतात तेथे नगरपालिकेच्या समोर पार पडला होता.