Sun, May 26, 2019 19:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील तेरा विद्यापीठांत अटल विचार अध्यासन केंद्र

राज्यातील तेरा विद्यापीठांत अटल विचार अध्यासन केंद्र

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत अटल विचार अध्यासन केंद्र सुरू करण्यात येईल. राज्य सरकार त्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. त्याचबरोबर अटलजींचे साहित्य व विचार याविषयी पीएच.डी.साठी संशोधन करणार्‍या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यांच्या जीवन पटातून उपलब्ध करून देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. असंख्य नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडे अटलजींच्या आठवणी व फोटो आहेत. त्या आठवणींच्या नोंदी आणि छायाचित्रांचे संकलन करून एक कॉफीटेबल बुक प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे अटलजींच्या आठवणींचा ठेवा, असेल त्यांनी तो द्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. 

राज्यातील 12 नद्यांत अस्थींचे विसर्जन 

दिल्ली येथून अटलजींचा अस्थी कलश बुधवारी दुपारी मुंबईत आणण्यात येणार असून राज्यातील विविध 12 नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईत होणार्‍या श्रद्धांजली सभेत राज्यातील सर्व जिल्ह्यांना अस्थी कलश हस्तांतरित करण्यात येतील. मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये त्याचे विसर्जन करण्यात येणार आहे. 

महानगरपालिका, नगरपालिका - नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तसेच अन्य संस्था, मंडळे व महामंडळांमध्ये अटलजींना श्रद्धांजली वाहणारे शोक प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.