Wed, Nov 14, 2018 13:03



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अटलबिहारींची डोंबिवलीकरांशी तीनदा झाली होती भेट

डोंबिवलीकरांच्या आठवणीतले वाजपेयी

Published On: Aug 16 2018 6:39PM | Last Updated: Aug 16 2018 6:46PM



डोंबिवली : बजरंग वाळुंज

स्वामी विवेकानंदांचे निस्सीम शिष्य म्हणून ओळख असलेले लोकसभेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची डोंबिवलीकरांशी तीनदा भेट झाली होती. वाजपेयी हे स्वामी विवेकांनंद यांचे शिष्य होते आणि म्हणूनच तत्कालिन प्रदेश नेत्याचा विरोध असताना ते डोंबिवलीत ३१ डिसेंबर १९८० रोजी आले होते. त्यांच्या हस्ते त्यावेळच्या डोंबिवली नगरपालिकेच्या इमारतीवरील स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याची आठवण डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी सांगितली.

डोंबिवली नगरपालिकेने पालिकेच्या इमारतीत दर्शनीस्थळी स्वामी विवेकानंद यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याचे उद्घाटन लोकसभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे हस्ते करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. त्याला शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक ॲडव्होकेट शशिकांत ठोसर यांनी अनुमोदन दिले होते. या संदर्भात डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी म्हणाले, नगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन मी पक्षाच्या प्रदेश नेत्यांकडे गेलो व अटलबिहारी वाजपेयी यांना डोंबिवलीत आणण्यासाठी विनंती केली. तथापी त्यावेळच्या एका प्रदेश नेत्याने याला विरोध केला. वाजपेयींना तुम्ही लहान समजता का ? असा सवाल त्या प्रदेश नेत्याने विचारला. इतक्यात तेथे वेदप्रकाश गोयल (विद्यमान रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे वडिल) तेथे आले व त्यांनी आपण वाजपेयींना भेटू असे सांगितले. 

त्यानंतर आम्ही दिल्लीत गेलो आणि वाजपेयींना आमंत्रण दिले. तुम्हाला बोलविण्याचा आणि स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण तुमच्या हस्ते करण्याचा डोंबिवली नगरपालिकेने एकमताने प्रस्ताव केला असल्याचे सांगितले. तेव्हा वाजपेयी यांनी एकूण किती खर्च केला, पुतळा कसा आहे, बजेट किती, असे प्रश्न विचारून अवास्तव खर्च केला नाही ना ? असाही प्रश्न केला. समाधानकारक उत्तरे आणि अपेक्षित माहिती मिळाल्यानंतरच त्यांनी डोंबिवलीत येण्याचे मान्य केले. मात्र मी राजकारणावर काही बोलणार नाही; मी येणार तो केवळ स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून येणार असून फक्त त्यांच्याबददलच बोलणार अशी अट घातली. त्याप्रमाणे ते आले व त्यांनी तब्बल पाऊण तास स्वामी विवेकांनद यांच्याबद्दल उद्बोधक भाषण केले असेही पटवारी यांनी माहिती देताना सांगितले. 

हा कार्यक्रम सद्या ज्या भागाला इंदिरा चौक म्हणतात तेथे नगरपालिकेच्या समोर पार पडला होता. डोबिवली इतिहास ग्रंथामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबतीत माहिती काही प्रमाणात उपलब्ध आहे. ऑक्टोबर १९६६ रोजी टिळकनगर विद्यामंदिर शाळेजवळील विस्तीर्ण मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांना डोंबिवली नगरपालिकेतर्फे मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर 1 नोव्हे 1966 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर डोंबिवली नगरपालिकेतर्फे तत्कालीन नगराध्यक्ष व्यं. ल. जपे यांच्या हस्ते तत्कालीन खासदार अटलबिहारी वाजपेयी यांना चांदीच्या करंड्यातून मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तात्पर्य असे की, अटलबिहारी वाजपेयी यांचे पाय वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या भूमीला तीनदा पाय लागले होते.