Fri, May 29, 2020 03:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अस्मिता योजनेकडेे बचतगटांची पाठ

अस्मिता योजनेकडेे बचतगटांची पाठ

Published On: May 28 2018 1:50AM | Last Updated: May 28 2018 12:55AMमुंबई : साईनाथ कुचनकार

ग्रामीण महिला आणि मुलींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत माहिती मिळावी, आरोग्यासंदर्भात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाकांक्षी अस्मिता योजना 8 मार्च जागतिक महिला दिनी राज्यात सुरू केली. योजना चांगली असतानाही नियोजन आणि ग्रामीण पातळीवर बचतगटांच्या महिलांना योग्य मोबदला मिळत नसल्याने बचतगटांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. 

ग्रामीण महिलांमध्ये मासिक पाळीसंदर्भात जागृती नाही. अनेक महिला पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. या महिलांच्या आरोग्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. महिलांना मासिक पाळीसंदर्भात पुरेपूर ज्ञान मिळावे, त्यांनी याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावे, या दिवसांमध्ये योग्य स्वच्छतेसाठी जनजागृती आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा, सोबतच बचतगटांना यातून रोजगार मिळावा हा उद्देश ठेवून महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे खासकरून महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अस्मिता ही योजना सुरू केली. योजना ग्रामपातळीवर व्यवस्थित राबविण्यासाठी उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचार्‍यांवर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली, तर महिला आणि मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिनबद्दल माहिती देण्यासाठी बचतगटांना निमंत्रित करण्यात आले. उद्देश चांगला असतानाही योग्य नियोजन आणि ग्रामपातळीवर महिला बचतगटांना मिळणारा नफा याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने या योजनेकडे महिला बचतगटांनी दुर्लक्ष केले आहेे.

ग्रामीण महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यासाठी शासनाने विविध पातळीवर वितरकांची नियुक्ती केली आहे. सदर वितरक राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर सॅनिटरी नॅपकिन पुरवतात. त्यानंतर ज्या बचतगटांनी शासनाकडे नोंदणी केली आहे, त्या गटांच्या सदस्यांनी तालुकास्तरावरून गावापर्यंत सदर नॅपकिन घेऊन जायचे आहे. मात्र गावातील महिला आणि मुलींची संख्या, त्यात सॅनिटरी नॅपकिन वापरणार्‍यांची संख्या आणि तालुकास्तरावरून गावात सॅनिटरी नॅपकिन घेऊन जाण्यासाठी लागणारा खर्च, बचतगट महिलांची मजुरी यांचा विचार केल्यास या बचतगटांच्या हातात एक दमडीही शिल्लक राहात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या, अशी स्थिती झाली आहे.

योजनेची माहिती ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कर्मचारी बचतगटांच्या महिलांची मनधरणी करीत आहेत, तर दुसरीकडे योग्य मोबदला मिळत नसल्याने बचतगटांतील महिला या योजनेकडे अपेक्षित प्रमाणात लक्ष देत नाहीत. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था या अभियानातील कर्मचार्‍यांची झाली आहे.