Wed, Jul 17, 2019 12:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीला चांगलेे जेवण करण्यास सांगणे हा छळ नव्हे : हायकोर्ट 

पत्नीला चांगलेे जेवण करण्यास सांगणे हा छळ नव्हे : हायकोर्ट 

Published On: Aug 07 2018 1:45AM | Last Updated: Aug 07 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

पत्नीला नवर्‍याने अथवा कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तीने घरातील कामाबरोबरच चांगले जेवण करण्याचा सल्ला देणे म्हणजे छळ नव्हे असा, निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. सांगली येथील 17 वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्या प्रकरणी दाखल झालेल्या अपिलावर न्यायमूर्ती सारंग कोतवाला यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना पती आणि त्याच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केली.

सांगली येथील विजय शिंदे यांचा आत्महत्या करणार्‍या महिलेशी  1998 मध्ये विवाह झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्या महिलेने जून 2001 मध्ये विष पिऊन आत्महत्या केली.  या प्रकरणी सांगली न्यायालयात विजय शिंदे आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होेता. 

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशय, घरकाम आणि चांगले जेवण करण्याचा सासरच्या मंडळींकडून तगादा लावला जात होता. त्यातून भांडण होऊन ती विष प्यायली, असा दावा करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने हा दावा फेटाळून आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपिलावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. कुटुंबाकडून वारंवार जेवण चांगले करण्याचा तगादा लावला जात असल्याने या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीकडून केला गेला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.

घरातील सुनेला जेवण व्यवस्थित बनवायला सांगणे अथवा तिला घरकाम करायला सांगणे म्हणजे तिला वाईट वागणूक दिली असा अर्थ होत नाही. सुनेला त्रास दिल्याचा किंवा तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच नवर्‍याचे दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप सिद्ध होऊ शकेल असा कोणताही पुरावा फिर्यादी पक्षाला सादर करता आलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करून आरोपींना निर्दोष  सोडण्याच्या जिल्हा न्यालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केली.