होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 2 हजार दुर्मीळ हस्तलिखिते, 10 हजार दुर्मीळ पुस्तके ऑनलाईन

2 हजार दुर्मीळ हस्तलिखिते, 10 हजार दुर्मीळ पुस्तके ऑनलाईन

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 8:34AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

एशियाटिक सोसायटी हे ठिकाण म्हणजे हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांच्या चित्रपट शूटिंगपासून मुंबईतील पर्यटकांचे खास आकर्षण. येथे येणार्‍या अभ्यागताने एशियाटिकच्या व्हरांडा किंवा पायर्‍यांवर फोटो, सेल्फी, छोटासा का होईना व्हीडिओ काढला नाही असे होत नाही. मात्र, हीच एशियाटिक लायब्ररी दुमीर्र्ळ ग्रंथांचा, हस्तलिखितांचा खजिना असून आता लायब्ररीने स्वतःची ग्रंथ संजीवनी ही वेबसाईट सुरू केली असून त्यावर ग्रंथप्रेमींसाठी 2 हजार हस्तलिखिते, तसेच 10 हजार दुर्मीळ पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.  

अनेक वर्षांचे प्रयत्न व सातत्य ठेवून एशियाटिक प्रशासनाने 15 जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या उपस्थितीत आपली http://www.granthsanjeevani.com ही वेबसाईट सुरू केली. ग्रंथालयाने याच वेबसाईटवर डिजिटायझेशन करण्यात आलेली 10 हजार दुर्मीळ  पुस्तके व 2 हजार हस्तलिखिते उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये 1913 ते 1959 या कालावधीतील बॉम्बे क्रॉनिकलचे अंक, 19 व्या शतकातील बॉम्बे न्यूजपेपरचे काही महत्त्वाचे वाल्यूम, 19 व्या शतकापासूनची शासकीय प्रकाशने, अहवाल, तसेच बॉम्बे गॅझेट आदी महत्त्वाच्या ग्रंथांचा समावेश आहे. 

ही वेबसाईट युजर फ्रेंडली असून त्यावर लेखक, विषय, प्रकाशक, प्रकाशनाचे ठिकाण, प्रकाशन वर्ष आदी कोणत्याही माहितीच्या आधारे पुस्तकांचा शोध घेता येतो. शिवाय ही यादी सातत्याने अद्ययावत करण्यात येते. त्यासोबत पुस्तकांची त्रोटक माहितीही उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्ण पुस्तकच वाचायचे असेल तर मात्र अगोदर फी भरावी लागते. ही वेबसाईट पायरसी-प्रूफ करण्यात आली आहे. पुस्तकांचे मायक्रो फिल्मींगचे काम एशियाटिकच्या इमारतीत करण्यात आले असून त्यावेळी त्याची पायरसी होणार नाही याची काळजीही घेण्यात आली आहे. डिजिटायझेशन झालेल्या पुस्तकांचा डेटा हार्ड ड्राईव्हजमध्ये सेव्ह करण्यात आला असून त्याचे बँक व्हॉल्टमध्ये जतन करण्यात आले आहे.  

ग्रंथ संजीवनीमध्ये अनेक बहुमूल्य ग्रंथांचा समावेश आहे. त्यामध्ये इतिहास, साहित्य, वनस्पतीशास्त्र, वेद, ब्रह्मज्ञानसारख्या विविध विषयांचा समावेश आहे. काही ग्रंथ तर 13व्या शतकातील आहेत. पर्शियन भाषेतील रुमीच्या ‘मसनावी’  या 1275 मधील ग्रंथाची दुर्मीळ कॉपी येथे पाहायला मिळते. 16 व्या शतकातील गणित व खगोलशास्त्रावरची हस्तलिखितेही येथे आहेत. विशेष म्हणजे ही हस्तलिखिते देवनागरीमध्ये आहेत. राजपुतान्यात घडून आलेल्या बंडांवरची युरोपियन इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तके, अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीवर लिहिलेले ग्रंथ, तसेच इतर राज्यकर्त्यांवरचे दुर्मीळ  ग्रंथही येथे पाहायला मिळतात.

एशियाटिकमधील अनेक ग्रंथांची पाने फाटून त्याचे तुकडे झाले असले तरी हे तुकडेही एकत्र जुळवून ते जतन करण्यात आले आहेत. काहींचे डिजिटायझेशनही झाले आहे. तो एशियाटिकचा ऐतिहासिक वारसा असल्याने ग्रंथालयाकडे जसजशी रक्कम उपलब्ध होत आहे, त्यानुसार त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.   

> महत्त्वाचा भाग म्हणजे एशियाटिक लायब्ररीमध्ये असंख्य जुने, दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आहेत. त्याच्या डिजिटायझेशनचे काम ग्रंथालयाने हाती घेतले. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तीनी मदत केली, काही रक्कम ग्रंथालय सदस्य, पदाधिकार्‍यांनी उभी केली. शिवाय याबाबत सरकारकडेही मदत मागण्यात आली. ग्रंथालयाने उभ्या केलेल्या रकमेत 2015 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. शासनाने एशियाटिकमधील ग्रंथ जतनासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाला तरी ही रक्कम हाती पडली नव्हती.

> एशियाटिक लायब्ररीची स्थापना होऊन 200 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. लायब्ररीत 300 वा त्यापेक्षा अधिक वर्षांचे जुने ग्रंथ आहेत. कालौघात यापैकी अनेक
ग्रंथ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही नष्टही झाले आहेत. त्यामुळे येथील सर्वच ग्रंथांचे डिजिटायझेशन होणं आवश्यक आहे, परंतु याबाबत शासन
गंभीर असल्याचे अजूनही आढळून येत नाही. 

एशियाटिकच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प 2015 मध्ये संपला. तत्पूर्वी शासनाने त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तशी ही रक्कम बर्‍यापैकी
होती. मात्र, प्रकल्प संपला तरी ही रक्कम काही हाती पडली नाही. एशियाटिकने डिजिटायजेशनच्या हाती घेतलेल्या प्रकल्पाला दानशूर व्यक्तींनी मोठी मदत
केली. वार्षिक सभासदांकडून 2400 रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा करण्यात आली. त्याचाही मोठा हातभार लागला. - शरद काळे, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी