Tue, Sep 25, 2018 15:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिद्रेंच्या कुटुंबीयांना पोलीस तपासावरच संशय

अश्‍विनी बिद्रेंच्या कुटुंबीयांना पोलीस तपासावरच संशय

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:15AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

बेपत्ता पोलिस निरिक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस तपासावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. तपासातील दिरंगाईबद्दल न्यायाधीश आणि महिला आयपीएस अधिकार्‍याची समिती नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नवी मुंबईचे   पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आरोपींना मदत केली असल्याने त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशीही त्यांची मागणी       आहे. 

बेपत्ता अश्‍विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी मुख्यमंत्री  फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. भेट न झाल्याने मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी नगराळे हे आरोपींना मदत करीत असल्याने त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली. आरोपी कुरुंदकर पोलिस दलातील अधिकारी तर दुसरा आरोपी माजी मंत्र्यांचा भाचा असल्याने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. पोलिसांवर तपासाबाबत दबाव टाकला जात आहे, असेही गोरे यांनी सांगितले. 

सध्या या प्रकरणाचा तपास करीत असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची तपास पूर्ण होईपर्यंत बदली करु नये. बदली झालेल्या महिला पोलीस अधिकारी संगिता अल्फान्सो यांची तपास टीममध्ये फेरनियुक्ती व्हावी, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करतानाच आरोपी कुरुंदकर यांचे भाऊ संजय कुरुंदकर हे पोलिस दलातच कार्यरत असून ते तपासात हस्तक्षेप करीत असल्याने त्यांची बदली चंद्रपूर किंवा गडचिरोलीत करावी, अशी मागणीही गोरे यांनी केली.