होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे हत्या: फळशीकरची रोज १९ तास चौकशी!

अश्विनी बिद्रे हत्या: फळशीकरची रोज १९ तास चौकशी!

Published On: Mar 04 2018 2:05AM | Last Updated: Mar 04 2018 2:05AMनवी मुंबई : प्रतिनिधी

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन सहायक पोलीस आयुक्तांकडून महेश फळशीकर आणि कुंदन भंडारी यांची गेल्या चार दिवसांपासून रोज 19 तास चौकशी केली जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजता ही चौकशी सुरु होते ती थेट मध्यरात्री तीन वाजेपर्यंत असते. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसापांसून भंडारी आणि फळशीकरला रोज भाईंदरला नेले जात आहे. त्यांच्या चौकशीतून रोज नवी माहिती मिळत असल्याने ठोस पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भंडारीला 5 तर फळशीकरला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठवली असल्याने सात मार्च रोजी कुरुंदकरला पुन्हा तपासासाठी ताबा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला जाणार आहे. ताबा मिळताच एकत्रपणे तिघा आरोपींची उच्चस्तरीय अधिकार्‍यांसमोर चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

भाईंदर येथील कुरुंदकरच्या घरातील फ्रीज तपास पथकाने सील केला  आहे. फॉरेन्सिक तज्ञांनी फ्रीजमधील काही महत्वाचे नमुने तब्यात घेतले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, कुरुंदकरने अश्‍विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर शीर आणि हात, पाय फ्रीजमध्ये ठेवले. धड मात्र फ्रीजमध्ये बसले नाही. ते एका ट्रंकमध्ये ठेवण्यात आले होते. ट्रंकसह मृतदेह खाडीत फेकला की तुकड्या तुकड्यांमध्ये हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. अश्‍विनी यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नौदलाचीही मदत घेतली जाणार असून, सोमवारी त्या दिशेने गतिमान हालचाली होवू शकतात.