होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे सर्च ऑपरेशन अखेर संपले

अश्विनी बिद्रे सर्च ऑपरेशन अखेर संपले

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:52AMनवी मुंबई/आजरा : पुढारी वृत्तसेवा 

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या दोन दिवसांपासून सुरु केलेले वसई खाडीतील मृतदेह सर्च ऑपरेशन मंगळवारी रात्री थांबवले. दोन दिवस सलग 32 तास चाललेल्या या शोधमोहिमेतून गुन्हे अन्वेषण पथक, नौदल आणि कोस्टलगार्डच्या हाती मात्र, काहीही लागले नाही.

सर्च ऑपरेशननंतर आता अश्‍विनी बिद्रे यांचे हत्येनंतर तुकडे करण्यासाठी वापरलेल्या कटरच्या शोधात एक तपास पथक फिरत आहे. ते कटरदेखील अद्याप हाती लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व गुन्ह्यांत सरकारी पंचाचा वापर करण्यात आला आहे. अनेकवेळा न्यायालयात केस पटलावर आल्यानंतर पंच फुटत असल्याने गुन्ह्यांचे महत्व कमी होऊन आरोपी सुटतात. त्यामुळे पंचाची काळजी गुन्हे अन्वेषण तपास पथकाने घेतली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यांच्या तपासाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आल्याचे समजते.सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्यानंतर खुप उशिरा गुन्हा  दाखल झाला, त्यानंतरच्या तपास प्रक्रियेत झालेल्या वेळ गेला. परिणामी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि त्यास मदत करणारे महेश फळशीकर,  राजेश पाटील आणि चालक कुंदन भंडारी या सर्वांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बराच काळ मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले. 

हत्या होऊन 22 महिने उलटल्यानंतर बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष मिळतील का, असा प्रश्‍न तपास पथकापुढे होता. मात्र आरोपींनी दिलेल्या कबूली जबाबानुसार वसईखाडीत शोध मोहिमे घेणे गरजेचे होते. न्यायालयाल तसा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याने तपासाच्या दृष्टीने ज्या काही महत्वाचे आहे. त्या सर्व बाबींचा तपास करणे तपासपथकाचे काम असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. 

आजरा : सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे यांच्या हत्येप्रकरणी आजरा कनेक्शन स्पष्ट होत असल्याने पोलिसांनी मुंबईनंतर तपासाचा केंद्रबिंदू आजरा व परिसर ठेवला असून, एका जिल्हास्तरीय बड्या सहकारी संस्थेत काम करणार्‍या आजरा येथील एकाची व गडहिंग्लज येथील आचारी काम करणार्‍या एकाची अशा दोघांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने अभय कुरूंदकर याचा स्थानिक मित्र परिवार आपल्या पाठीमागेही चौकशीचा ससेमिरा लागेल, या भीतीने धास्तावला आहे. आजरा येथील संबंधित तरुण हादेखील यापूर्वी अटक झालेल्या महेश फळणीकर याच्याप्रमाणेच कुरूंदकर याचा बालमित्र आहे. त्याच्यासोबत कुरूंदकर याच्या हाळोली येथील फार्म हाऊसवर वेळोवेळी जेवण बनवण्यासाठी येणार्‍या गडहिंग्लज तालुक्यातील एकाची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी किती आजरेकरांची चौकशी होणार? व या प्रकरणाचा शेवट काय? या दोन प्रश्‍नांकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.