Tue, Apr 23, 2019 14:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभय कुरूंदकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

अभय कुरूंदकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Published On: Jun 24 2018 7:40PM | Last Updated: Jun 24 2018 7:40PMनवी मुंबई : प्रतिनिधी

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी उद्या 25 जून रोजी अलिबाग सत्र न्यायालयात पीआय अभय कुरुंदकर यांच्या जामीन अर्जावर तर राजेश पाटील याच्या जामीन अर्जावर 26 जूनला मुंबई हायकोर्टात  सुनावणी होणार आहे. 13 एप्रिल रोजी अलिबाग सत्र न्यायालयाने राजेशचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केल्याचे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. 

या हत्याकांडाचा तपास करणार्‍या पोलीस  आधिकारी एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो यांची मुदत 30 जूनला संपत असतानाही अद्याप  राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली नसल्याचे गोरे म्हणाले. एसीपी अल्फोन्सो यांना  30 जूनला आश्विनी बिंद्रे हत्याकांड तपासातून नवी मंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे कार्यमुक्त करत आहेत. तर क्राईम एसीपी हे  देखील 30 जूनला निवृत होत आहेत. मग नवीन तपास अधिकारी काय व कसा तपास करणार? असा प्रश्न गोरे यांनी उपस्थित केला आहे. 

आरोपी अभय कुरूंदकर व राजेश पाटील या दोघांना जामीन होण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त  जाणूनबूजून प्रयत्न करत असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. 

आश्विनी बिंद्रेच्या हत्याकांडातील  आरोपींना जामीन न होण्यासाठी आणि पुढील तपास होण्यासाठी  एसीपी संगिता शिंदे-अल्फान्सो यांना कार्यमुक्त न करता मुदतवाढ द्यावी, यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला. प्रत्यक्षात भेट घेतली मात्र अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि पुढील सुनावणी जलदगती न्यायालयात चालवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात नव्याने अश्विनी बिद्रे यांचा भाऊ व पती दोघेजण मुंबई हायकोर्टात रिटपिटीशन दाखल करणार आहेत. त्यामध्ये आरोपी कुरूंदकर यांचा भाऊ सरकारी नोकर असून पोलीस खात्यात आहे. ते प्रयोगशाळेतील अहवाल,   जामिनासाठी वकील देणे आणि इतर मदत करत असल्याचे मुद्दे उपस्थित केले जाणार असल्याचे राजू गोरे यांनी सांगितले.  

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्यापैकी त्यांनी एकही पाळले नाही. त्यावरून ते मारेकर्‍यांना वाचवत आहेत, हे आता उघड झाले आहे, असा खळबळजनक आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांनी केला.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हा पोलीस अधिकारी असून दुसरा आरोपी राजेश पाटील हा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. त्यामुळेच सरकार आणि पोलीस खाते त्यांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असल्याचा आरोप यावेळी गोरे आणि बिद्रे यांनी केला.