Sun, Aug 18, 2019 14:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिद्रेंच्या मृतदेहासाठी वसई खाडीत शोधमोहीम

बिद्रेंच्या मृतदेहासाठी वसई खाडीत शोधमोहीम

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:38AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

सहायक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण पोलिसांनी नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने सोमवार सकाळपासून वसईच्या खाडीत शोधमोहीम सुरू केली आहे. सायंकाळपर्यंत मृतदेहाचे अवशेष तपास पथकाच्या हाती लागले नव्हते. 

ही शोधमोहीम तीन दिवस सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन एसीपी आणि 22 कर्मचारी या शोधपथकात सहभागी झाले आहेत. भाईंदरच्या खाडीतही शोधमोहीम राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तपासपथकाबरोबर कुंदन भंडारी आणि महेश फळशीकर या दोघांनाही नेण्यात आल्याचे समजते. सोबत सरकारी कर्मचारी म्हणून तीन पंच  बरोबर आहेत, अशीही माहिती देण्यात आली. या प्रकरणात अभय कुरुंदकर, राजेश पाटील, महेश फळशीकर आणि कुंदन भंडारी या अटकेत असलेल्या आरोपींवर आरोप सिद्ध करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष सापडणे महत्त्वाचे आहे. 

दरम्यान, अभय कुरुंदकरच्या कोल्हापूर-आजरा येथील फार्महाऊसची रविवारी तपासपथकाने झाडाझडती घेतली. त्याचबरोबर भाईंदर, कात्रज येथेही तपासपथकाने झडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काहीही पुरावे लागले नसल्याचे सांगण्यात आले. 

दुसरीकडे, एक तपासपथक कटरच्या शोधात कामाला लागले आहे. ज्या कटरच्या सहाय्याने अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तो कटर महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करावा लागणार आहे. 

 भंडारीची कोठडी वाढवली

नवी मुंबई : प्रतिनिधी

अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभय कुरुंदकर याच्या गाडीचा खासगी चालक कुंदन भंडारीच्या पोलीस कोठडीत पनवेल न्यायालयाने 14 मार्चपर्यंत वाढ केली. मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि पुरावे नष्ट करण्यासह अभय कुरुंदकरला मदत करणे, असा आरोप गुन्हे अन्वेषण तपास पथकाने भंडारीवर ठेवला आहे. भंडारीची अजून चौकशी बाकी आहे. त्यामुळे पोलीस कोठडी  वाढवून मिळण्याची विनंती तपास पथकाने न्यायालयाकडे केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे भंडारीची कोठडी न्यायालयाने वाढवली.