Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फेकले खाडीत

अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फेकले खाडीत

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 7:29AMठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाण्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरच्या कारमध्ये बसल्या. कार भाईंदरच्या दिशेने निघाली. रस्त्यात दोघांमध्ये पुन्हा वाद भडकला आणि धावत्या कारमध्येच कुरूंदकरने अश्‍विनी यांचा गळा दाबून खून केला... कार सरळ कुरूंदकरच्या भाईंदरमधील घरासमोर थांबली. याच घरात अश्‍विनी यांच्या मृतदेहाचे वूडकटरने तुकडे करण्यात आले. कुरूंदकरचा मित्र महेश फळणीकर याने कबुलीजबाब दिला आणि अखेर अश्‍विनी बिंद्रे यांच्या खुनाला वाचा फुटली.

आजवर पोलिस दप्‍तरी नोंद असलेल्या एकापेक्षा एक भयंकर हत्यांचाही थरकाप उडावा, अशी हत्या बेपत्ता सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांची झाली. मुख्य आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याचा बालपणीचा मित्र आणि या हत्येतील एक आरोपी महेश फळणीकरने तोंड उघडले आणि या भयंकर खुनाला वाचा फुटली. हा तपास पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. नवी मुंबई पोलिसांनी ते सहज पेलले.

अटक झाल्यानंतरही पोलिस दलातच तयार झालेला कुरूंदकर तपासाला दाद देत नव्हता. त्याचे मोबाईल रेकॉर्ड, अश्‍विनी बिंद्रेसोबतच्या भांडणाचा, मारहाणीचा व्हिडीओ हाती लागल्यानंतरही अश्‍विनी बिंद्रे कुठे आहे, याचे उत्तर ना कुरूंदकर देत होता, ना तपास कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचत होता. थेट उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली हा तपास सुरू असल्याने मुंबई पोलिसांनी अश्‍विनी यांचा थांगपत्ता लावण्यासाठी जंग जंग पछाडले. यात पहिला धागा हाती लागला तो कुरूंदकरचा चालक कुंदन भंडारी याचा. त्याच्याच चौकशीतून कुरूंदकरकडे झाड कापण्याचे मशिन होते आणि ते आता गायब झाल्याचे समजले. कुठल्याही पोलिस अधिकार्‍याकडे झाड कापण्याचे मशिन असण्याचे तसे कारण नसते. इतकी शंका कुणालाही येते. मात्र, हा भंडारी स्वत: अश्‍विनी यांच्या खुनाचा साक्षीदार असूनही काय घडले, ते सांगत नव्हता. कुरूंदकरच्या फोन रेकॉर्डची पुन्हा पुन्हा छाननी करीत पोलिस दुसर्‍या धाग्यापर्यंत पोहोचले तो म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेेश पाटील. त्याच्या अटकेनंतरही तपास ठोस दिशेने जात नव्हता.

वाचा : मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदलाची मदत

गेल्या आठवड्यात पोलिसांनी अभय कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकरला पुण्यात कात्रजमधून उचलले. हा फळणीकर कुरूंदकरचे आर्थिक व्यवहारही बघत असे. याचा अर्थ तो कुरूंदकरचा अत्यंत विश्‍वासू असला पाहिजे. हा धागा पकडून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आणि अश्‍विनी बिंद्रे यांची हत्या कशी झाली, याची अंगाचा थरकाप उडवणारी कहाणीच त्याने पोलिसांना ऐकवली. अश्‍विनी यांच्या हत्येला स्वत: फळणीकर साक्षी होताच. चालक भंडारीदेखील हत्येच्या वेळी हजर होता.

गळा दाबून हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश फळणीकरने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अश्‍विनी बिंद्रे या कुरूंदकराला भेटण्यास ठाणे येथे आल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हा अश्‍विनी यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला. कारमध्ये त्यांच्यासोबत मी देखील होतो. रस्त्यात कुरूंदकर व बिंद्रे यांच्यात कारमध्येच जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, कुरूंदकरने बिंद्रे यांची गळा दाबून हत्या केली.

वसई खाडीत तुकडे फेकले

अश्‍विनी बिंद्रे कारमध्ये निपचित पडल्यानंतर अभय कुरूंदकरने त्याचा साथीदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा भाचा राजेश पाटील याला फोन केला. राजेश पाटील हा भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पित बसला होता. कुरूंदकरने फोन करताच तो त्यास भेटायला आला. कुरूंदकरने मला तसेच खासगी चालक कुंदन भंडारी व राजेश पाटील यांना सोबत घेतले व लाकूड कापायच्या कटर मशिनने अश्‍विनी यांच्या शरीराचे बारीक तुकडे केले. ते तुकडे प्लास्टिक पिशवीत भरून मध्यरात्री कारमधून वसईच्या खाडीत फेकले. हा सारा घटनाक्रम 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडला, असे त्याने जबाबात सांगितले.

फळणीकर, भंडारीच्या पोलिस कोठडीत वाढ

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे खूनप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या महेश फळणीकर व चालक कुंदन भंडारीच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी वाढविण्यात आली आहे. मुख्य संशयित व निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

वाचा : अश्‍विनी बिंद्रे खूनप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

शुक्रवारी दुपारी दोघांना पनवेल येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले. भंडारीला दि. 5 पर्यंत, तर फळणीकरची दि. 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात अश्‍विनीचा पती राजू गोरे, भाऊ आनंद बिंद्रे व अन्य नातेवाईक उपस्थित होते.

कुरूंदकरला ताब्यात घेण्यासाठी हालचाली

संशयित फळणीकर, भंडारीच्या चौकशीतून खून प्रकरणातील गूढ उलगडू लागल्याने मुख्य संशयित कुरूंदकरला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. कुरूंदकर, फळणीकर व भंडारी यांची एकाचवेळी स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा तपास अधिकार्‍यांचा सूर आहे. कायदा व विधी सल्ला अधिकार्‍यांचा अभिप्राय घेऊन पनवेल न्यायालयात अर्ज दाखल करण्याबाबत निर्णय होईल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.