Mon, Feb 18, 2019 06:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुण्याचा विद्यार्थी ताब्यात

पुण्याचा विद्यार्थी ताब्यात

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:06AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येनंतर पुण्याला पळून गेलेल्या सतरा वर्षांच्या मुख्य आरोपीस अखेर समतानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातील एका महाविद्यालात शिक्षण घेणार्‍या या तरुणाला उज्ज्वल भविष्य आणि पैशांचे आमिष दाखवून कटात सामिल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बुधवारी डोंगरीतील बालन्यायालयातून बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत यापूर्वी गणेश भास्कर जोगदंड,  सोहेल अजीत दोधिया या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा चालक गणेश व हत्येपूर्वी रेकी करणारा सोहेल या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. रिक्षाचालक गणेश  मारेकर्‍यांना घेऊन अशोक सावंत यांच्या मागावर गेला होता. सोहेल हा मारेकर्‍यांसोबत होता. त्याने चार ते पाच तास मारेकर्‍यांसोबत रेकी करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या चौकशीत  या सतरा वर्षीय आरोपीचे नाव समोर आले होते. 

एका आरोपीच्या बहिणीच्या मदतीने त्याची इतर दोन्ही मारेकर्‍यांसोबत ओळख झाली होती. ते दोघेही कांदिवलीतील समतानगरचे रहिवासी आहेत. त्या दोघांनी हत्येच्या कटाची माहिती देऊन भरपूर पैशांचे आमिष दाखवले होते. चॉपरने तीन ते चार वेळा वार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. आरोपी बारावीत शिकत असल्याची माहिती सुभाष वेळे यांनी दिली.