Mon, Nov 19, 2018 23:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून नाही: अशोक चव्हाण

जागावाटप: राष्ट्रवादीकडून प्रस्ताव नाही- चव्हाण

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 8:07AMमुंबई : प्रतिनिधी

भाजपा विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनासोबत घेऊन निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने देशपातळीवर सुरू केली आहे. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आलेला नाही. यासंदर्भात त्या पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही औपचारिक चर्चा सुद्धा झालेली नसल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आघाडीसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला समसमान म्हणजे 50-50 टक्केचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून यास दुजोरा दिला जात आहे. मात्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन पक्षांत आघाडीबाबत एकमत झाले आहे. अद्याप जागा वाटपाबाबत कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही किंवा कुणी कुणाला त्यासाठी प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट केले. 

निवडणुकीतील जागांचे वाटप करताना कोणत्या जिल्ह्यात कुणाची किती ताकद जास्त आहे. मतदारसंंघातील एकंदर राजकीय परिस्थिती, आघाडीचे घटक पक्ष कोण? या सर्व गोष्टींचा आधार घेऊन निर्णय करावा लागेल. पण यासंदर्भात काहीच झालेल नसताना जागा वाटपाच्या प्रस्तावाची चर्चा जन्माला घालणे चुकीचे आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून लढत असताना नेमके काय करावे लागेल. याबाबत काँग्रेसच्या पक्षांतर्गत वैठका सुरू असून सर्व जिल्ह्यांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.