Thu, Apr 25, 2019 03:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण कायम

महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण कायम

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 2:02AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष हेच यापुढे कायम असतील असा निर्णय शनिवारी घोषित केला आहे. यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर खा. अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे आपल्या पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रक काढून प्रत्येक राज्यातील प्रदेश अध्यक्ष आपापल्या पदावर कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील संघटनात्मक निवडणुकांपर्यंत राज्यातील कोणत्याही नेतृत्वात बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश 

भीमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. टिळक भवन येथील बैठकीत काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यात जातीय तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेली ही घटना सरकारचे अपयश असल्याची भावना व्यक्त केली.

अजोय मेहता यांनी स्पष्ट बोलावे : अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मोघम आरोप करण्यापेक्षा स्पष्ट बोलावे. कमला मिल दुर्घटनेनंतर या प्रकरणात असो किंवा अन्य बांधकामांच्या विरोधातील कारवाईबाबत ज्या नेत्यांनी आयुक्त मेहता यांच्यावर फोन करून दबाव आणला त्या नेत्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे चव्हाण म्हणाले.