Tue, Apr 23, 2019 07:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आसनगांव ठरले पहिले ‘ग्रीन स्टेशन’

आसनगांव ठरले पहिले ‘ग्रीन स्टेशन’

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 12:58AMआसनगाव : वार्ताहर

नैसर्गिक ऊर्जेचा वापर करण्यात येणार्‍या मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाची महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी ग्रीन स्थानक म्हणून रविवारी अधिकृत घोषणा केली. या ग्रीन स्थानकांतर्गत सौर ऊर्जा व विंड एनर्जी प्रकल्पाच्या माध्यमातून 16.2 किलो व्हॅट वीजनिर्मिती केली जाणार असून, या प्रकल्पामुळे स्थानकाच्या वीजबिलात मोठी बचत होणार आहे. यानुसार आता स्थानकातील दिवे, पंखे आणि तिकीट मशीन्स पवन ऊर्जा तसेच सौर ऊर्जेवर चालणार आहेत.

मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असलेल्या आसनगाव स्थानकातून परिसरातील शेकडो गावातील 75 हजाराहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. गेल्या आठवड्यात आसनगाव स्थानक ग्रीन स्टेशन म्हणून घोषित होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांनी दिली होती. त्यानुसार रविवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या स्थानकावर पाच कि. व्हॅटचे दोन सौर ऊर्जा युनिट तसेच 6.2 कि. व्हॅटचे पवनचक्की व सौर ऊर्जेचे एकत्र युनिट असे एकूण 16.2 कि. व्हॅट क्षमतेचे एकूण तीन युनिट  बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 11 लाख रुपयांचा खर्च आला असून स्थानकावरील विद्युत उपकरणांसह एलईडी दिवे, सिलिंग फॅन, तिकीट खिडक्यांवरील संगणक सौर ऊर्जेवर चालणार आहेत. यामुळे वीजदेयकात किमान 70 टक्क्यांची बचत होणार आहे.

आसनगाव स्थानकाव्यतिरिक्त इतर 50 स्थानकांत एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वीजबिलात 1.48 कोटी रुपयांची बचत प्रतिवर्षी होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांच्यासह रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव, अनिता झोपे, जगदीश धनगर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबई ते आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावरील सुविधा तसेच प्रवाशांच्या विविध मागण्यांचे निवेदन महाव्यवस्थापकांना देण्यात आले.