Sun, Apr 21, 2019 06:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अरुण गवळीच्या नावाने मुलुंडमध्ये दीड कोटींच्या खंडणीची मागणी 

अरुण गवळीच्या नावाने मुलुंडमध्ये दीड कोटींच्या खंडणीची मागणी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुलूंडमधील एका 71 वर्षीय वयोवृद्ध व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीच्या नावाने धमकावत तब्बल दिड कोटींची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीची मागणी करणार्‍या रघु शिंदे विरोधात मुलूंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी कक्ष करत आहे. 

मुलूंड पश्‍चिमेकडील योगीहील परिसरात कुटूंबासोबत राहात असलेल्या 71 वर्षीय तक्रारदार व्यावसायिक यांचा ट्रक्टरचे स्पेअर पार्ट बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्याची वार्षीक उलाढाल 35 ते 40 कोटी आहे. याची माहीती मिळवत रघू शिंदे याने 25 मार्चच्या रात्री दहाच्या सुमारास त्यांना फोन केला. दगडी चाळीतून डॅडीचा माणूस बोलतोय असे सांगून शिंदे तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले. कोणीतरी आपली थट्टा मस्करी करत असल्याच्या समजातून व्यावसायिक यांनी याकडे दुर्लक्ष केला. मात्र पुन्हा 27 मार्चला शिंदे फोन आला. 

गेल्या 10 दिवसापासून आमची माणसे तुमच्या मागावर आहेत. तुमच्या व्यवसायाची आणि कुटूंबाची सर्व माहिती आम्ही काढली आहे, असे सांगत या व्यक्तीने दीड कोटींच्या खंडणीची मागणी केली. माझ्यावर बर्‍याच बँकांचे कर्ज आहे. मी एक गरीब व्यावसायिक असून एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही असे या व्यावसायिकाने सांगाताच पैसे न दिल्यास मुलांना मारण्याची धमकी शिंदेने दिली. धमकीमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने तात्काळ मुलाला सोबत घेऊन मुलुंड पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी शिंदे नावाच्या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Tags : Mulund, Mulund news, Arun Gawli, name demanded,  ransom, 


  •