Wed, Jul 17, 2019 08:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अरुण गवळी टोळीच्या शार्प शूटरला अटक 

अरुण गवळी टोळीच्या शार्प शूटरला अटक 

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 12:52AM मुंबई : प्रतिनिधी

तीन हत्येसह हत्येचा प्रयत्नाच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच पळून गेलेला आणि गेल्या 23 वर्षांच्या वॉण्टेड असलेल्या अरुण गवळी टोळीचा शार्पशूटर गुंड सुरेश दिनानाथ उपाध्याय (46) याला बदलापूर येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुरेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला पुढील चौकशीसाठी भांडुप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. 

नव्वदच्या दशकात मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गँगवार उसळले होते, यावेळी गवळीच्या आदेशावरुन भांडुप आणि उल्हासनगर येथे तीन व्यक्तींची निर्घृणरीत्या हत्या करण्यात आली तर एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. या चारही गुन्ह्यांत सुरेश उपाध्याय हा मुख्य आरोपी होता. 

भांडुप येथे एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर सुरेश उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात होता. तेव्हा त्याने त्याच्या वकिलांच्या मदतीने विशेष सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला तीन हत्या आणि एक हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत जामिन मंजूर झाला होता. 

शुक्रवारी सुरेश उपाध्याय हा बदलापूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकातील सतीश तावरे, मनिष श्रीधनकर, संतोष मस्तुद, संजय सुर्वे, आनंद बागडे, सुरेश साळुंखे, लक्ष्मण गायकवाड, महेंद्र कालुष्टे, रोहिदास हासे, विशाल खैरनार या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच सुरेश उपाध्याय असल्याचे उघडकीस आले. सुरेश हा अरुण गवळीचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून परिचित होता. गवळीच्या आदेशावरुन त्याने तिघांची हत्या केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेल्याने त्याला कोर्टात फरार आरोपी म्हणून घोषित केले. अखेर त्याला 23 वर्षांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने व त्यांच्या पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला भांडुप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

1995 साली जामिनावर बाहेर येताच सुरेश हा मुंबईतून पळून गेला होता. वेगवेगळ्या परिसरात तो स्वत:चे नाव आणि अस्तिस्व लपवून राहत होता. 

गेल्या काही वर्षांपासून तो बदलापूर येथे राहत होता. त्याच्या वास्तव्याची माहिती मिळताच युनिट सातच्या अधिकार्‍यांनी गेल्या एक महिन्यांपासून बदलापूर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.