Thu, Mar 21, 2019 23:41
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  सरकारी रुग्णालयांत वृद्धांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करा 

 सरकारी रुग्णालयांत वृद्धांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करा 

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:28AMमुंबई :  प्रतिनिधी 

सरकारी रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या कक्षाप्रमाणे वृद्धांसाठी कक्षाची व्यवस्था करावी, अशी सूचना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केली. लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयमान’ या पुस्तक प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. जोशींनी एक व्यक्ती कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना विविध क्षेत्रांत कशी यशस्वी होते, याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवल्याचे कौतुकोद‍्गार शरद पवार यांनी काढले. राजकारण, कला, साहित्य, क्रिकेट अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या मांदियाळीत हा कार्यक्रम पार पडला. दादर येथील शिवाजी मंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.  जोशींनी या पुस्तकाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे व वृद्धांचे प्रश्‍न ऐरणीवर आणले आहेत, असे प्रतिभाताई म्हणाल्या. 

शरद पवार म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश संपादन करण्याचे उत्तम उदाहरण जोशींनी स्वतःच्या उदाहरणाद्वारे जगासमोर ठेवले आहे. मराठी माणसांनी उद्योजक व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या पुस्तकातील प्रत्येक मुलाखत प्रोत्साहित करणारी आहे.  

कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील, मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, क्रिकेटपटू अजित वाडेकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, डॉ. रमेश जोशी, अभिनेते रमेश देव, माजी महसूलमंत्री सुधीर जोशी, केसरी पाटील उपस्थित होते. 

मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंत्री म्हणून केलेल्या कामाचा व अनुभवाचा सध्या केंद्रात वाहतूक मंत्री म्हणून काम करत असताना लाभ होत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. शिवसेनाप्रमुखांच्या मनातले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोशी झटत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राची संस्कृती, साहित्य, कला, यांची आठवण राज्याबाहेर असताना मोठ्या प्रमाणात येते. महाराष्ट्र व मुंबईची सर देशात कुठेच नाही. किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे, त्याप्रमाणे जोशींचे आयुष्य आहे. नवीन पिढीला या पुस्तकामुळे प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. 

बाळासाहेबांनी मराठी माणूस व हिंदूमध्ये आत्मविश्‍वास जागवला. प्रबोधनकार व बाळासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कार्यात मग्न होते. मनोहर जोशींनी आपल्या या पुस्तकाद्वारे त्या विचारांचे गाईड तरुणांच्या हातात देण्याचे काम केले आहे. निवृत्ती ही वृत्ती आहे. माझे अद्याप निवृत्तीचे वय आलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी मार्गदर्शन करणे योग्य ठरणार नाही असे उद्धव म्हणाले.