Thu, Jul 18, 2019 02:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुमारे दीड कोटीचे बनावट शाम्पू, कंडिशनर व मुद्देमाल जप्त

बनावट शाम्पू : टोळी पकडली

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

केस मऊ, मुलायम व सुंदर आणि काळेभोर दिसण्यासाठी महागडे, ब्रॅण्डेड शॅम्पू-कंडिशनर लावण्याकडे तरुण-तरुणींचा मोठा कल असतो. पण ब्रॅण्डेड शॅम्पू-कंडिशनरचा नाद चांगलाच महागात पडू शकतो. शिवाय तुम्ही जर ऑनलाइन एखादे शॅम्पू कंडिशनर स्वस्त दरात मिळते म्हणून घेणार असाल तर सावधान. कारण तुम्हाला मिळणार्‍या वस्तू खर्‍या असतीलच असे नाही. शहरातील वेगवेगळ्या सुपर मार्केट, ब्युटी पार्लर आणि ऑनलाइन साईटवर बनावट सौंदर्य प्रसाधने विकणार्‍या टोळीचा छडा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून लावण्यात आला असून सुमारे दीड कोटीची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली आहेत.

एफडीएच्या बृहन्मुंबई विभागा (औषध)तील अधिकार्‍यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अधिकार्‍यांनी 4 मे रोजी मुंबईतील तीन ठिकाणी छापे टाकत लॉरिअलच्या कंटेनर्समधून बनावट शॅम्पू-कंडिशनर विकणार्‍या टोळीचा छडा लावला आहे. लॉरिअलच्या रिकाम्या कंटेनर्स भंगारवाल्यांकडून खरेदी करत त्यात बनावट, अवैधरित्या-विना परवाना तयार केलेले शॅम्पू आणि कंडिशनर या कंटेनर्समध्ये भरून विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश अखेर अन्न आणि औषध प्रशासाना (एफडीए)ने केला आहे. 

साईबाबा मंदिर, अंधेरी पूर्व येथील यमुनाबाई चाळीतील एका खोलीत लॉरिअलच्या शॅम्पू-कंडिशनरच्या रिकाम्या, वापरलेल्या कंटेनर्समध्ये बनावट, विनापरवाना-अवैधरित्या तयार केलेला शॅम्पू-कंडिशनर भरला जात असल्याचे इथे छापा टाकला असता एफडीए अधिकार्‍यांना आढळून आले. या छाप्यात 40 लाखांचा बनावट माल तर 3.38 लाखांचा कच्चा माल आणि इतर सामग्री एफडीए अधिकार्‍यांनी जप्त केले आहे.

अंधेरी (प) येथील नवरंग सिनेमा, जवळील मे. बायो कॉस्मेटिक्स या नावाखाली रावरिया बनावट शॅम्पू-कंडिशनर तयार करत असल्याचेही समोर आले आहे. साकीनाका येथील, सेठिया नगरमधील पोळ चाळ क्रमाक 2 इथून रावरिया यांनी जुन्या-रिकाम्या कंटेनर्सची खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता इथेही बनावट शॅम्पू-कंडिशनरचा साठा आढळला असून येथून पुजारी नावाच्या व्यक्तिकडून 90 लाखांचा कच्चा माल आणि इतर सामग्री जप्त केली आहे.

पुजारी याने बनावट शॅम्पू-कंडिशनरची खरेदी हेन्री डिसुजा याच्याकडून खरेदी केल्याचे पुजारीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्याप्रमाणे डिसुजाच्या पार्ल्यातील दुकानात छापा टाकला असता इथेही बनावट शॅम्पू-कंडिशनर तयार केले जात असल्याचे आढळून आले आहे. तर या ठिकाणाहूनही एफडीए अधिकार्‍यांनी 4 लाख 88 हजाराचा कच्चा माल जप्त केला आहे.