Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरमध्ये लष्कराला पाचारण

पालघरमध्ये लष्कराला पाचारण

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 1:13AMमुंबई/ठाणे/नालासोपारा/पालघर : पुढारी वृत्तसेवा

धुवाधार पावसाने सलग चौथ्या दिवशी महामुंबईची दाणादाण उडवली. पाच वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद सोमवारी केल्यानंतरही पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. मुंबईपेक्षाही पालघर जिल्ह्यात पावसाने अधिक हाहाकार उडवला असून संपूर्ण जनजीवन कोलमडून पडले आहे. मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी नालासोपार्‍यातूनच पश्‍चिम रेल्वेला ब्रेक लागला. नदी, नाले आणि जंगल पार करून महापुराचे पाणी गाववस्त्यांमध्ये शिरले. नालासोपार्‍यात रूळांवर तब्बल 460 मि.मी. पाणी चढल्याने लष्कराला पाचारण करीत विरार-नालासोपारा दरम्यान अडकून पडलेल्या वडोदरा एक्स्प्रेसमधील दोन हजार प्रवाशांची सुटका करण्यात आली. वसई तालुक्यात ठिकठिकाणी लोक अडकून पडले असून त्यांची सुटका करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (एनडीआरएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत. अर्थात हे जलयुद्ध इथेच थांबलेले नाही. आणखी 24 तास धोक्याचे असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

पालघर आणि वसई परिसरात गेल्या 24 तासांत 240 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. त्यात भरतीच्या लाटांचीही भर पडल्याने सर्वत्र महापूर उसळला आणि अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की, एनडीआरएफची एक कंपनी वसईमध्ये पोहोचली असून गरज भासल्यास आणखी जवान मागवले जातील. 

एनडीआरएफचे जवान कुठल्याही अडथळ्याविना नालासोपार्‍यापर्यंत पोहोचावेत म्हणून ठाणे-पालघर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. एनडीआरएफचे एकूण 42 जवान होते व त्यांच्याकडे 6 बोटी होत्या. त्यापैकी 3 बोटीतून मिठागरे येथे अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. त्यांना अण्णासाहेब वर्तक कॉलेज येथे सुखरूप पोहचवण्यात आले.

एनडीआरएफच्या जवानांनी तातडीनेवडोदरा एक्स्प्रेसच्या किमान दोन हजार प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. विरार आणि नालासोपारा दरम्यान रूळांवर पूर आल्याने ही एक्स्प्रेस जागीच थांबली होती. या प्रवाशांना खासगी बसेसची व्यवस्था करून नायगाव स्टेशनपर्यंत आणण्यात आले. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.

सोमवारी सकाळी 8.30 पासून ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत पालघरमध्ये प्रचंड म्हणजे 240 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात भरतीच्या लाटाही उसळल्या. परिणामी पूरपावसात अडकून पडलेल्यांची सुटका करण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यांच्या मुक्‍कामाची सोय करण्यासाठी स्थानिक शिक्षण संस्थांच्या इमारती ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही नारनवरे म्हणाले. 

पालघर जिल्ह्यातील माणिकपूर गाव  तर पुराने वेढले गेले. पाण्याची पातळी वाढल्याने गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी जाणेही कठीण होऊन बसले. या गावात शेवटी एनडीआरफचे पथक पाठवावे लागले. सोमवारी वसईत सुमारे 300 लोक पुरात अडकले मात्र त्यांनी घरे सोडण्यास नकार दिला. तात्पुरत्या निवार्‍यात जाण्यापेक्षा घर बरे अशी भूमिका या लोकांनी जिल्हा प्रशासनाला ऐकवली. पालघर जिल्ह्यात खास करून वसई-विरार परिसरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले असून त्याचा निचरा होण्यास किमान दोन ते तीन दिवस लागतील. परिणामी जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.