Wed, Apr 24, 2019 20:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शस्त्रास्त्रे तस्करीत ९३ स्फोटातील संशयित

शस्त्रास्त्रे तस्करीत ९३ स्फोटातील संशयित

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

उत्तरप्रदेशातील गोदामामधून शस्त्रसाठा चोरी करुन मुंबईत आणण्यामागे 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांमधील डी गँगच्या संशयितांना सहभाग असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांच्या अटकेत असलेल्या बदयुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत उर्फ सुका (27) याच्याकडे कसून चौकशीनंतर तपास यंत्रणांनी मुंबईसह अन्य राज्यांतील डी गँगच्या त्या हस्तकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. 

मुंबईतील आंबोली परिसरातून बोलेरो गाडी चोरी केल्यानंतर त्यामध्ये शस्त्रसाठा ठेवण्यासाठी योग्य ते बदल करुन घेत शस्त्रसाठा चोरी करण्यात आला. मात्र नशेच्या आहारी गेलेल्या सुका याच्या स्वभावामुळे हा शस्त्रसाठा मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर जप्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या सुका याच्यासह सलमान खान, नागेश बनसोडे आणि सुकाचा नंबरकारी आमीर शेख यांच्याकडे तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांमधील डी गँगच्या संशयितांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सुका याचे वडील अकबर बादशाह याच्याकडेही 93 च्या बॉम्बस्फोटातील संशयीत म्हणून चौकशी करण्यात आली होती. शिवडी, नागपाडा आणि डोंगरीतील सुका याच्या साथिदारांसोबत दाऊदचा साथिदार मुन्ना झिंगाडाचे काही हस्तक, तसेच हा शस्त्रसाठा आणण्यात सहभागी होते, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. तर राजस्थानातील अजमेरमधून 93 च्या बॉम्बस्फोटांवेळी शस्त्रास्त्रे तस्करीतील संशयितालाही याप्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समजते.