Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत शस्त्रास्त्र तस्कराचा थरारक पाठलाग करून अटक

डोंबिवलीत शस्त्रास्त्र तस्कराचा थरारक पाठलाग करून अटक

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 1:55AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीतील गजबजलेल्या नाक्यावर गुन्हेगारांना अग्निशस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या तस्कराच्या क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तब्बल अर्धा तास कडवी झुंज देऊन मुसक्या बांधण्यात यश मिळविले. या तस्कराने उत्तरप्रदेशातून आणलेल्या 2 जिवंत काडतुसांसह देशी बनावटीचे 2 कट्टे क्राईम ब्रँचने त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. हबीब रशीद शेख (27) असे या तस्कराचे नाव असून तो जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील इस्लामपुरा (श्रीराम पेठ) या गावचा रहिवासी आहे. 

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्टेशन आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वृंदावन नाक्यावर शस्त्र साठ्यासह तस्कर येणार असल्याची माहिती कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि संतोष शेवाळे यांच्यासह राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, सतीश पगारे, अरविंद पवार, हरिश्चंद्र बंगारा आणि विश्वास चव्हाण या पथकाने शनिवारी दुपारपासूनच नाक्यावर जाळे पसरले होते. जवळपास तासाभराच्या प्रतीक्षेनंतर एक तरुण या नाक्यावर आला. पोलिसांनी चहोबाजूंनी त्याला घेराव घातला. आपण पकडले जाणार असल्याची खात्री पटताच या तरुणाने तेथून धूम ठोकली.

तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या पाठलागानंतर  पोलिसांच्या तो हाती लागला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत चौकडी शर्टात गुंडाळून ठेवलेले काडतूसांनी लोड केलेले 2 देशी बनावटीचे कट्टे आढळून आले. या शस्त्रास्त्रांची बाजारपेठेतील किंमत 30 हजार 500 इतकी आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी कल्याण कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.