होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लंकेश हत्याप्रकरणातील आरोपींना जालन्यात शस्त्रप्रशिक्षण

लंकेश हत्याप्रकरणातील आरोपींना जालन्यात शस्त्रप्रशिक्षण

Published On: Sep 04 2018 8:05AM | Last Updated: Sep 04 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक केलेल्या आरोपींनीही जालना येथील फार्महाऊसवरच शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. याच आरोपींसोबत सेनेचा माजी नगरसेवक आणि नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटक आरोपी श्रीकांत पांगारकर संपर्कात असल्याचा दावा करत एटीएसने त्याच्या वाढीव कोठडीच्या केलेल्या मागणीवरुन विशेष सत्र न्यायालयाने त्याला 6 तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

आर्थिक रसद आणि मदत पुरविल्याच्या आरोपाखाली अटक केलेला पांगारकर हा मूळचा जालन्यातील रहिवासी असून तो औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे. तो दोन सिमकार्ड वापरत असून यातील एकच सिमकार्ड त्याच्या स्वत:च्या नावावर आहे. तो हा मोबाईल कायम घरी ठेवतो आणि दुसर्‍याच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर करुन अन्य आरोपींसोबतच कर्नाटक विशेष पथकाने गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. याबाबतचे कॉल डिटेल्स आणि मेसेज हाती लागले असल्याचे एटीएसने न्यायालयात स्पष्ट केले. 

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या विशेष पथकाकडून पांगारकरबाबत माहिती मागविण्यात आली होती. त्यात विशेष पथकाने अटक आरोपीजवळून जप्त केलेल्या डायरीमध्ये पांगारकरच्या नावाचा उल्लेख असल्याची आणि अटक केलेल्या आरोपींनीही जालना येथील फार्महाऊसवरच शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक माहिती एटीएसला दिली आहे. तसेच तपासामध्येही पांगारकर याने अमरावतीमध्ये रेकी केली असून अन्य आरोपींसोबत तो दुसर्‍या नंबरवरुन संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पांगारकरने आरोपींसोबत रेकी करण्यासाठी भेट दिलेल्या ठिकाणांबाबत कसून चौकशी सुरु आहे. 

पांगारकरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्याची गेल्या दोन वर्षांतील आर्थिक व्यवहार, बँक ऑफ ओव्हरसीजमधील खात्यातील 2010 सालापासून आतापर्यंतचे आर्थिक व्यवहार आणि सुंदरलाल नावजी अर्बन को-ऑप. बँकेतील खात्यातून करण्यात आलेल्या गेल्या तीन वर्षातील आर्थिक व्यवहारांचा तपशील बँकांकडून ताब्यात घेण्यात आला असून त्याआधारे पांगारकरकडे पैसा कसा  आला, पैसा कसा गेला, पैसा कसा वापरला याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. याच्यासोबत अन्य कारणे, तपासातील प्रगती आणि करावयाचा तपास याबाबत न्यायालयात युक्तिवाद करत पांगारकरच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली.

नालासोपारा आणि पुण्यातून स्फोटके, शस्त्रसाठा जप्त केलेल्या राऊत, गोंधळेकर  आणि कळस्कर याच्याकडे चौकशीपूर्ण झाल्याचे सांगत एटीएसने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली. तर यातील स्फोटके किंवा शस्त्रे, तसेच मोटारसायकल आणि बनावट नंबरप्लेट पांगाकरकडून जप्त केले नाहीत तरीही त्याच्या कोठडीची मागणी तपास यंत्रणा करत आहे. अटकेवेळीच एटीएसने पांगारकरवर आर्थिक रसद आणि मदत पुरविल्याचा आरोप ठेवला होता. त्यामुळे गेले 15 दिवस एटीएसने त्याच्या बँक खात्याचा तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. 

पांगाकरच्या चौकशीतून माहिती समोर आल्याचे सांगत एटीएस त्याच्या वाढीव कोठडीची मागणी करत आहे. त्याच्या आवाज, हस्ताक्षर पडताळणीची आवश्यकताच नाही. तसेच कर्नाटक विशेष पथकाने अटक केलेल्या आरोपीला पहिल्या दिवसापासून एटीएसने पाहीजे आरोपी दाखविले आहे. त्याच्या अटकेसाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र आरोपीकडील माहितीत पांगारकरचे नाव आले आहे. अशी माहिती देत पांगारकरच्या चौकशीची आवश्यकता असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचा युक्तिवाद करत अ‍ॅड. संजीव पुन्हाळेकर यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर न्यायालयाने पांगारकरच्या कोठडीमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. 

राज्यामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत एटीएसने वैभव राऊत याच्यासह शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार याला अटक केली आहे. पवार वगळता अन्य आरोपींच्या कोठडीची मुदत संपत असल्याने एटीएसने सोमवारी दुपारी त्यांना विशेष सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी एटीएसने राऊत, कळस्कर आणि गोंधळेकर याच्याकडील चौकशी पूर्ण झाली असल्याचे सांगत त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्याची मागणी एटीएसच्या वतीने सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तीघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले.

न्यायालयाने हे आदेश देताच, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभागी असणार्‍या आरोपी शरद कळस्कर याचा ताबा मिळविण्यासाठी सीबीआयने न्यायालयात अर्ज केला. ही मागणी मान्य करत न्यायालयाने त्याचा ताबा सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. मात्र यावेळी डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचे तपास अधिकारी न्यायालयात हजर नसल्याने त्यांना बोलवा आणि नंतरच ताबा घ्या, असे न्यायालयाने सीबीआयला बजावले. त्यानुसार साडेचारच्या सुमारास न्यायालयात पोहचलेल्या तपास अधिकार्‍याने एटीएसकडून कळस्करचा ताबा घेतला.