Sun, May 26, 2019 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी गजाआड

सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी गजाआड

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

मानखुर्द रेल्वे स्थानकात गोळा झालेली तब्बल 16 लाख 61 हजार रुपयांची रक्कम व्हॅनमधून घेऊन जात असताना पिस्तूल, चॉपरच्या धाकावर रक्‍कम लुटणार्‍या टोळीला मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. ही घटना 13 जूनच्या दुपारी सायन-पनवेल महामार्गावरील धोबी घाट परिसरात घडली होती. 

गोरेगावमधील सिक्युरीटी ट्रान्स या खासगी कंपनीकडे विविध स्थानकातील पैसे गोळा करण्याचे कंत्राट आहे. गोरेगाव येथून निघालेल्या या कॅशव्हॅनने शहरातील विविध 29 ठिकाणहून रोख रक्कम गोळा केल्यानंतर शेवटी ही व्हॅन मानखूर्द रेल्वे स्थानकात पोहचली होती. कॅशव्हॅनमध्ये कंपनीच्या व्यवस्थापकासोबत चालक आणि एक सुरक्षा रक्षक असे तिघे होते. 

व्हॅन सायन-पनवेल मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागावर असलेल्या लुटारूंनी धोबी घाटजवळ व्हॅनच्या काचेवर बांबू मारून भर रस्त्यात व्हॅन थांबविली. त्यानंतर चॉपर आणि पिस्तूलाच्या धाकावर व्हॅनमधील 16 लाख 61 हजार 212 रुपये भरलेली बॅग हिसकावून मारुती अल्टो कारमधून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालक वैभव चव्हाण (21) याची फिर्याद नोंदवून पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लख्मी गौतम आणि पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 8 पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. 

लुटीचा हा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. तसेच लुटारुंनी वापरलेल्या मारुती अल्टो कारच्या क्रमांकाच्या आधारे शोध घेेतला असता गोवंडीतील आगारवाडी परिसरात ही कार बेवारस अवस्थेत सापडली. कारची माहिती काढली असता लुटारुंनी ही कार नवी मुंबईतील नेरुळ परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारला बनावट नंबर प्लेट लावून ती गुन्ह्यासाठी वापरल्याचे उघड झाले. मात्र, पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता कारसोबत एक रिक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

घाटकोपर पश्‍चिमेकडील नारायण नगरात राहत असलेल्या मोहम्मद सागीर ऊर्फ गुलाब उर्फ पेहलवान चिराग मोहम्मद शेख (40) या संशयीत रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याने गुन्ह्यातील 9 आरोपींची नावे सांगितले. त्या आधारे पोलिसांनी वजय लोहाट ऊर्फ विजय ठाकरे (38), डेव्हीड लॉरेन्स (33), जगदीश ऊर्फ जग्गू अण्णा सुर्वणा (49) आणि संतोष राजपूत (30) यांना बेड्या ठोकल्या. 

घटनेच्या दिवशी चारजण देवनार कत्तल खाना, तर अन्य पाचजण बैंगनवाडी परिसरात येऊन थांबले. बैगनवाडीमध्ये गुन्ह्याचा मास्टर प्लॅन आखून अर्धातास आधीच अल्टो कार आणि रिक्षातून मानखुर्द रेल्वे स्थानक तसेच धोबीगाट सर्व्हीस रोड गाठला गेला. येथे ठरल्याप्रमाणे अल्टो कार आडवी घालून ही लुट करण्यात आली. 

आरोपींपैकी सागीर, लोहाटने गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर तळोजामधील रहिवासी लॉरेन्सने चोरीची अल्टो कार आणली. पनवेलमध्ये वास्तव्यास असलेल्या सुर्वणा आणि मुंब्र्यातील राजपूतने सिमकार्ड आणल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.