Sat, May 30, 2020 11:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय हवा

लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय हवा

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत अधिकाधिक परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या घनतेवर एफएसआय देणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध वास्तूविशारद डॉ. चंद्रशेखर प्रभू यांनी मंगळवारी  मुंबई विद्यापीठात व्यक्‍त केले. 

मुंबईच्या विविध प्रश्‍नांवर कालिना येथील मुंबई विद्यापीठामध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन आणि संशोधन केंद्र याठिकाणी ‘मुंबईतील परवडणारी घरे आणि गृहनिर्माण व्यावसाय’ या विषयावर प्रसिद्ध वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते.

मुंबईमध्ये गेल्या काही काळापासून लोकसंख्या ही वाढलेली नसून मुंबई मेट्रो रिजनमध्ये (एमएमआर)  लोकसंख्या वाढलेली दिसून आली असल्याचे प्रभू यावेळी म्हणाले. पूर्वी मुंबई हे बेट म्हणून ओळखले जायचे. कालांतराने ही मुंबई वाढत गेली, मात्र त्यामानाने घरांची संख्या न वाढल्याने घरांच्या किंमती वाढल्या. सध्या मुंबईतील घरांच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. 

ज्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असेल त्या इमारतीमध्ये किती कुटुंबे राहत आहेत, त्या अनुषंगाने एसएसआय देणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. यामुळे रहिवाशांना त्यांच्या वाढणार्‍या कुटूंबाला आवश्यक असणार्‍या आकाराचे घर त्याच जागेवर उपलब्ध होईल असेही प्रभू यावेळी म्हणाले. सध्या मुंबईमध्ये होणार्‍या पुनर्विकास प्रकल्पामध्ये विकासक जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. विकासकांऐवजी रहिवाशांना त्यांच्या जागेवर पुनर्विकास राबवण्यास परवानगी देऊन त्यामधून परवडणारी घरे निर्माण होऊ शकतील, असेही प्रभू यावेळी म्हणाले. 

मुंबईमध्ये सात लाख झोपड्या आहेत. तर अडीच लाख रहिवासी धोकादायक इमारतीमध्ये राहतात. म्हाडाच्या 105 लेआऊट्समध्ये सुमारे दीड लाख रहिवासी राहत आहेत, तर बीआयटीमध्ये 15 हजार, बीडीडी चाळींमध्ये पंचवीस हजार कुटुंबीय राहत आहेत. यामधील 98 टक्के रहिवाशांना राहत असलेली जागा पुरेशी नाही. यातील 85 टक्के लोक सार्वजनिक प्रसाधन गृहे वापरतात. राहत असलेल्या बहुतांश घरांची स्थिती दयनीय आहे. या रहिवाशांना चांगले आणि आवश्यक असलेल्या आकाराचे घर नाही, मात्र तरीही ते मुंबईमध्ये घर विकत घेऊ शकत नाही.