होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्सोवा-विरार सागरी सेतूला मंजूरी

वर्सोवा-विरार सागरी सेतूला मंजूरी

Last Updated: Feb 22 2020 1:45AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन असून मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने वर्सोवा ते विरार सागरी सेतूला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे वरळी येथून सुरू होणारा सागरी सेतू थेट विरारला जोडला जाईल. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुचर्चित सागरी सेतूच्या विस्तारीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के उपस्थित होते. वरळी-वांद्रे सी लिंकचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर एमएसआरडीसीने या मार्गाचा विस्तार वर्सोवापर्यंत करण्याचा निर्णय जाहीर करुन प्रत्यक्षात कामाला सुरुवातही केली होती.

नुकत्याच झालेल्या बैठकीत तिसर्‍या आणि चौथ्या टप्यात वर्सोवा ते वसई दरम्यान सहा पदरी सागरी सेतू बांधण्याची घोषणा करण्यात आली असून याच्या पुढच्या टप्प्याचा विस्तार विरारपर्यंत करण्याचे सुतोवाच या बैठकीत देण्यात आले. त्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीकडे पाठविण्यात आल्याचे समजते.