मुंबई : चंद्रशेखर माताडे
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या कायद्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितने हे प्रारूप तयार करून विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केले आहे. आता त्याची छाननी होऊन हा अंतिम मसुदा तयार करून तो विधीमंडळापुढे सादर करण्याबाबत सरकार निर्णय घेईल.
अंबाबाई देवीला साडी नेसविण्याची पारंपरिक पध्दत आहे. मात्र त्याला छेद देत देवीला घागरा चोली हा पोषाख घातल्यामुळे कोल्हापुरतील वातावरण संघर्षमय झाले होेते. त्यातुनच पुजारी हटावची मागणी पुढे आली व हा संघर्ष धगधगत राहीला.
कोल्हापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याची तातडीने दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा कायदा करण्याचे आश्वासन दिले. हा कायदा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतरच कोल्हापुरात तयार झालेला तणाव निवळला.
पंढरपूर, शिर्डी व सिध्दीविनायक मंदिरात ज्याचा आधार घेऊन पगारी पुजारी नेमण्यात आले आहेत त्याच कायद्याचा आधार घेऊन हा कायदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची स्थापना ही स्वतंत्र कायद्याने न करता विश्वस्त निधीतील तरतुदींचा आधार घेउन केली असल्यामुळे या देवस्थानसाठीचा हा पहिलाच कायदा असणार आहे.मात्र या समितीच्या अखत्यारीत असलेली 3 हजार 67 देवस्थाने व 26 हजार हेक्टर जमीन यासंबंधी स्पष्टता नसल्यामुळे कायदा करताना त्या त्या देवस्थान व जमीनींच्या अधिकारांचे रक्षण करण्यात कटकटी होत्या. विशेषत: जमिनी कोणाकडे आहेत? त्या कोणत्या अधिकारात दिल्या आहेत यासंबंधीच्या या कटकटी आहेत. कायदा हा एखाद्या कारणासाठी केला जात नाही तर तो सर्वांगिण असतो. त्यामुळे या सर्व किचकट बाबीतुन मार्ग काढताना प्रारूप समितीसमोर मोठेच आव्हान होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी त्याचा प्रारूप तयार होऊ शकले नाही.