Thu, Jul 18, 2019 12:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयोगाचा अहवाल येताच तात्काळ मराठा आरक्षण लागू - चंद्रकांत पाटील

आयोगाचा अहवाल येताच तात्काळ मराठा आरक्षण लागू - चंद्रकांत पाटील

Published On: Jun 30 2018 4:52PM | Last Updated: Jun 30 2018 4:51PMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार बांधील आहे ते देणारच. मात्र त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष काढणारा अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यांचा अहवाल आल्यावर क्षणाचाही विलंब न  करता तात्काळ मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तसा अध्यादेशही काढण्यात आला. त्यानंतर हा विषय न्यायालयात गेला. न्यायालयात राज्य २७०० पानांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. मात्र न्यायालयाने सरकारने नाही, तर मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणचा चेंडू मागासवर्ग आयोगाच्या कोर्टात गेला. त्यातच राज्य सरकारची आयोग स्थापनेपासून सुरुवात होती. त्यामुळे मराठा आरक्षणाला विलंब होणार हे सिध्द झाले.  त्यातच न्यायालयाने मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्याने राज्य सरकारचे कान उपटले होते.

त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले आहे याची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून यासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यावर तो स्वीकारून विधिमंडळाच्या दोन्ही  त्यास सभागृहाची मान्यता घेऊन मराठा समाजाला आरक्षण लागू केले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.