Tue, Mar 26, 2019 12:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमपीएससीत समांतर आरक्षण लागू करा

एमपीएससीत समांतर आरक्षण लागू करा

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

शासकीय नोकरभरतीत अराखीव जागा या गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गांसाठी खुल्या असतात. त्यामुळे 2014 पूर्वी सामाजिक आरक्षणासाठी लागू असलेले तत्व समांतर आरक्षणासाठी लागू करून एमपीएससीतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक उमेदवार, महिला, खेळाडू, माजी सैनिकांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या 13  ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या भरतीपासून रोखणारे हे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सूचना  27 ऑगस्ट 2018 रोजी  सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आहेत. याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत लवकरात लवकर तसे आदेश मुख्यमंत्री स्तरावरून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 

ऑगस्ट 2014 मधील परिपत्रकानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या जागांसाठी केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांचा विचार केला जातो. गेल्या चार वर्षात खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देणार्‍या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीतून डावलले जात आहे. स्नेहा फरकाडे व भरतसिंग राठोड असिस्टंट प्रोफेसर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यांच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊनही एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून एकप्रकारे मागासवर्गीय उमदेवारांवर अन्याय केल्याचे त्यांनी म्हटले आहे.