Wed, Jul 17, 2019 10:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › “शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा चालणार नाही”

“शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा चालणार नाही”

Published On: Mar 22 2018 2:20PM | Last Updated: Mar 22 2018 2:26PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

'आम्ही सत्तेत आहोत आणि विरोधातही ही करमणूक करण्याचे शिवसेनेचे दिवस संपले. त्यांचा बिनपैशाचा तमाशा आता जास्त दिवस चालणार नाही', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याच्या निर्णयाबद्दल सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर तटकरेंनी टि्वटरवर एकापाठोपाठ एक ट्विट करत हल्ला चढवला. 

विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा विधानसभेत केली. या निर्णयाचे तटकरे यांनी स्वागत केले. पण त्याचबरोबर शिवसेनेवर लक्ष्य केले. 

जेव्हा मंत्रिमंडळात मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला गेला, तेव्हा शिवसेनेने मूक संमती दिली. त्यानंतर सभागृहात विरोधी भूमिका घेतली. सेनेचे हे वागण म्हणजे दांभिकपणाचा कळसच आहे. काल दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानंतर एका सदस्याने राजदंड पळवला. सरकार त्या सदस्यावर काय कारवाई करणार का?, असा सवाल ही तटकरेंनी केला. 

या निमित्ताने सेना-भाजपची हातमिळवणी समोर आली आहे. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करायचे. हे ढोंग आता जनतेला कळाल्याचे ते म्हणाले. तसेच बुधवारी सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोष देण्यात आले. पण गेल्यावर्षी अंगणवाडी सेविकांच्या 24 दिवसांच्या संपात बालकांचे मृत्यू झाले, मग ते कुणाचे पाप होते?, असे देखील तटकरे म्हणाले. 

No automatic alt text available.

Tags : Anganwadi Workers, NCP, Shivsena, BJP, MESMA